किशोर जोरगेवारांकडून अखेरच्या क्षणी मास्टर स्ट्रोक; समर्थकाच्या पत्नीला शिवसेनेतून तिकीट

चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2026 चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Election) आपल्या समर्थकांना जास्तीत जास्त तिकीट मिळवून देण्यासाठी भाजपमध्ये मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्यात रंगलेला वाद काल म्हणजेच उमेदवारी अर्ज व्यारण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना दिसून आला. मात्र त्यातही आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठी शक्कल लढवत आपल्या एका समर्थकाच्या पत्नीला अगदी शेवटच्या क्षणी तिकीट मिळवून दिले. आणि हे नाव आहे भाजपच्या (BJP) अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष राशीद हुसेन यांची पत्नी ईस्मत हुसेन यांचं.

भाजपसाठी अतिशय अवघड असलेल्या प्रभाग क्रमांक 10 म्हणजे एकोरी प्रभागातून ईस्मत हुसेन या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. सुरुवातीला भाजप आणि मित्र पक्षांच्या युतीबाबतच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा सुटेल, अशी चर्चा झाल्याने ईस्मत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादीसोबतची भाजपची युती तुटली आणि शिवसेने सोबत युतीचा निर्णय अंतिम झाला. मात्र त्यातही जोरगेवार यांनी शेवटच्या क्षणी आपल्या समर्थकाच्या पत्नीला शिवसेनेतून तिकीट मिळवून दिली आणि त्या एकोरी प्रभागातून शिवसेनेच्या उमेदवार ठरल्या. या उमेदवारी बाबत बोलताना जोरगेवार यांनी आम्ही फक्त ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात केलंय, असं मिश्किल उत्तर दिलं.

Chandrapur Election 2026 : जोरगेवार-मुनगंटीवार वादाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील रंगलं राजकीय नाट्य

– चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 नगरसेवकांच्या उमेदवारीसाठी कालावधी (मंगळवारी) सकाळी चंद्रपूर शहरातील एनडी हॉटेल येथे भाजपचे चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी अशोक नेते सकाळपासून ठाण मांडून बसले होते आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते वाट पाहत होते, ती निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार यांची.

-त्यानंतर जवळपास 11 वाजता भाजप आमदार किशोर जोरगेवार नागपूरहून चंद्रपूरच्या या हॉटेलमध्ये आपल्या ताफ्यासह दाखल झाले आणि त्यांनी अचानक मीडियासमोर उमेदवारी यादी माझ्या हातात आहे आणि या यादीतील दोन नावांवर माझा तीव्र आक्षेप आहे, अशी जाहीर घोषणा केली.

-त्यानंतर जोरगेवार हॉटेलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी चैनसुख संचेती आणि अशोक नेते यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू झाली. दुपारचे 1 वाजले तरीही भाजपच्या एकाही उमेदवाराच्या हातात एबी फॉर्म पडला नव्हता, कार्यकर्ते बाहेर बेचैन होते.

-हॉटेलच्या आत मध्ये किशोर जोरगेवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांचे भाजपच्या श्रेष्ठींना तातडीने फोन सुरू होते… भाजपच्या यादीमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांच्या नावांवर जोरगेवार यांना तीव्र आक्षेप होता

-अजय सरकार आणि पूजा पोतराजे या मुनगंटीवार समर्थकांच्या नावांवर हा आक्षेप होता, अजय सरकार यांच्यावर 302 सहित 20 गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना उमेदवारी का द्यावी असा जोरगेवार यांचा आक्षेप होता तर पूजा पोतराजे यांचे पती मनोज पोतराजे यांनी गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमांवर अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती, मग त्यांना उमेदवारी का असा जोरगेवार यांचा सवाल होता

– अखेर जा उमेदवारांच्या नावावर आक्षेप नव्हता त्या सर्वांचे हळूहळू एबी फॉर्म देण्यात आले आणि शेवटी या भांडणाला कंटाळून निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती दोन फॉर्म घेऊन हॉटेलच्या बाहेर निघून गेले

-अखेर जोरगेवार यांचा काही प्रमाणात विजय झाला आणि पक्षाने अजय सरकार यांची उमेदवारी कापून रॉबिन बिश्वास यांना उमेदवारी दिली तर पूजा पोतराजे यांच्यासोबत चंद्रकला सोयाम यांना देखील एबी फॉर्म देऊन हा वाद शमवला.

आणखी वाचा

Comments are closed.