ठाणे महानगरपालिकेत मनसे अन् ठाकरे गटाला धक्का, दोन उमेदवारांचे अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान ठाकरे गट आणि मनसेच्या (MNS) एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 17 मधून शिंदे गटाचे मनोज शिंदे यांच्याविरोधात रिंगणात असलेल्या ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Camp) उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. या उमेदवाराने याबाबत संशय व्यक्त करताना निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. माझा उमेदवारी अर्ज छाननीवेळी बाद ठरवण्यात आला. मी सही केली नाही आणि बँकेचे स्टेटमेंट न दिल्याचे कारण सांगत माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला.  माझा फॉर्म अवैध ठरवल्यानंतर मला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही की, तू पुन्हा एकदा नवीन प्रतिज्ञापत्र घेऊन ये. मी सकाळी आरओकडे आलो त्यावेळी त्याने मला काही सांगितले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला 10 मिनिटं असताना मला नवीन प्रतिज्ञापत्र घेऊन यायला सांगितले. मी गरीब घराचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्याबरोबर अन्याय करण्यात आला. माझ्यासमोर शिंदे गटाचे मनोज शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. त्यांनी तरी कुठे निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं तर नाही ना, असा संशय ठाकरे गटाच्या उमेदवाराने बोलून दाखवला. (TMC Election 2026)

तर दुसरीकडे ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 मधील मनसेचे उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना मला कागदपत्रं राहिल्याचे सांगण्यात आले. ती कागदपत्रं वेळेत देऊनही पोलिसांनी आम्हाला आत सोडण्यास नकार दिला. काहीवेळाने पोलिसांनी आम्हाला आतमध्ये सोडले तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचं काहीही ऐकून न घेता उमेदवारी अर्जाची छाननी केली आणि कागदपत्र नसल्याचे कारण देत आमचा अर्ज अवैध ठरवला. जेव्हा आम्ही यावर हरकत घेतली तेव्हा आम्हाला तुम्ही वेळेत न आल्याचं कारण सांगण्यात आले, असे मनसेच्या प्राची घाडगे यांनी सांगितले.

Avinash Jadhav Thane Election 2026: निवडणूक अधिकाऱ्यांची मुलगी फाईल घेऊन आली… अविनाश जाधवांनी नेमका काय आरोप केला?

मनसेच्या  प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवल्याबद्दल मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. प्राची घाडगे यांनी त्यांची चूक मान्य केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्यावेळी उमेदवार फॉर्म भरतो, त्याचा डिस्प्ले करावा लागतो, त्यानंतर छाननी प्रक्रिया सुरु होते. निवडणूक अधिकारी वैशाली मॅडम यांना 11 वाजता फॉर्म डिस्प्ले करायला पाहिजे होता. परंतु त्यांनी साडेतीन वाजता फॉर्म डिस्प्ले केला आणि तिकडेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन केले. आम्ही प्रतिज्ञापत्र लावायला विसरलो ते आम्ही नंतर आणून जमा केले. निवडणूक अधिकाऱ्यांची मुलगी दुपारी फाईल घेऊन आली होती. ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलो की कुठली फाईल होती, त्यावर मॅडमनी सांगितले की, डिप्रेशनच्या औषधाची फाईल होती तर आम्ही म्हणालो की, ही फाईल तुम्ही whatsapp वरती देखील मागू शकला असता. काही दिवसांपूर्वी आम्ही ठाण्यामध्ये आंदोलन केले होते आणि निवडणूक अधिकारी हा भ्रष्ट नसावा, अशी आम्ही मागणी केली होती आणि जाणून-बुजून ROने आमच्या उमेदवारांचा फॉर्म अवैध केलेला आहे, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.

अनधिकृत बांधकामामध्ये सहभागी असणारे भ्रष्ट अधिकारी यावेळी निवडणूक अधिकारी बनतात तर असाच प्रकार घडतो. भ्रष्ट अधिकारी नगरसेवक आणि नेत्यांच्या आदेशाचे पालन करतात. आज जी घटना घडलेली आहे त्याच्याबाबतीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना आम्हाला त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. ज्या निवडणूक अधिकारी म्हणून RO ला नेमण्यात आलेली आहे त्याच्यावरतीFIR दाखल करावा अशी आमची मागणी आहे, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली.

आणखी वाचा

भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?

आणखी वाचा

Comments are closed.