सरफराज, ईशान, मोहम्मद शमी IN…; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा, पा

न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियासमोर न्यूझीलंडविरुद्ध मोठी कसोटी असणार आहे. या दौऱ्यात भारत 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे. टी-20 मालिका आणि वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली असून, त्यात कसोटी आणि वनडेचा कर्णधार शुभमन गिल याला जागा मिळालेली नाही. आता न्यूझीलंडविरुद्धच्या 3 वनडे मालिकेसाठी जाहीर होणाऱ्या संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाहत्यांपासून क्रिकेट तज्ज्ञांपर्यंत, यावेळी काही धक्कादायक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाईट बॉल क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा कायम

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाचा 2-1 असा पराभव केला. भारत आता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीकडे वळलेला असून, त्यामुळे संघात फार मोठे बदल होण्याची शक्यता कमीच दिसते. मात्र, 1-2 जागांवर चुरस नक्कीच आहे.

ईशान किशनला मिळणार संधी?

ईशान किशन याने पुन्हा एकदा संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचा विश्वास जिंकला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करत झारखंडला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या ईशानची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे. इतकेच नव्हे तर, त्याची वनडे संघातही पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. वनडेमध्ये दुहेरी शतक ठोकणाऱ्या ईशानने विजय हजारे ट्रॉफीतही जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. हरियाणा आणि कर्नाटकविरुद्धच्या सलग दोन डावांत त्याने शतके झळकावली आहे.

सरफराज खान आणि मोहम्मद शमीला संधी?

माजी भारतीय कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी सरफराज खानला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “सरफराजला भारतीय संघात संधी कशी मिळत नाही, हे मला कळत नाही. धर्मशालामध्ये इंग्लंडविरुद्ध त्याची देवदत्त पडिक्कलसोबतची भागीदारी मी पाहिली होती. त्याने अप्रतिम फलंदाजी केली आणि भारताला कसोटी जिंकून दिली.” सरफराजने न्यूझीलंडविरुद्ध 2024 मध्ये वानखेडेवर शेवटची कसोटी खेळली होती, मात्र तो सामना त्याच्यासाठी अपयशी ठरला. पण विजय हजारे ट्रॉफीत त्याचा फॉर्म जबरदस्त आहे. गोव्याविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याने 75 चेंडूत 157 धावा (9 चौकार, 14 षटकार) अशी तुफानी खेळी केली. मागील पाच डावांत त्याच्या नावावर 3 अर्धशतके आणि 1 शतक आहे.

दुसरीकडे, मोहम्मद शमी सतत कामगिरीतून निवडकर्त्यांना संदेश देत आहे. लिस्ट-A क्रिकेटमधील मागील चार डावांत त्याने 8 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र 35 वर्षीय शमीला वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात भूमिका दिली जाणार का? हा मोठा प्रश्न आहे. जर संधी मिळाली, तर तो शमीसाठी नववर्षाची मोठी भेट ठरू शकते.

ऋषभ पंतवर टांगती तलवार

अपघातानंतर दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत जितका आपल्या प्रतिभेमुळे चर्चेत असतो, तितकाच तो खराब शॉट सिलेक्शनमुळे टीकेचा धनी ठरतो. विशेषतः गुवाहाटी कसोटीतील त्याच्या शॉट सिलेक्शनवर निवडकर्ते आणि टीम मॅनेजमेंट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पंतला जर पुन्हा संधी मिळाली, तर त्याला तात्काळ स्वतःला सिद्ध करावे लागेल. गेल्या 7-8 वर्षांत पंतने केवळ 31 वनडे सामने खेळले असून, त्यात त्याने 35.5 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध संभाव्य भारतीय वनडे संघ –

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, यशस्वी जैस्वाल, प्रसिद्ध कृष्णा, सरफराज खान / ऋषभ पंत, शिवम दुबे.

भारत विरुद्ध न्यूजीलंड ODI आणि T20I मालिका शेड्यूल

  • 11 जानेवारी: पहिला ODI – वडोदरा
  • 14 जानेवारी: दुसरा ODI – राजकोट
  • 18 जानेवारी: तिसरा ODI – इंदौर

T20I मालिका  :

  • 21 जानेवारी: पहिला T20I – नागपूर
  • 23 जानेवारी: दुसरा T20I – रायपूर
  • 25 जानेवारी: तिसरा T20I – गुवाहाटी
  • 28 जानेवारी: चौथा T20I – विशाखापट्टणम
  • 31 जानेवारी: पाचवा T20I – तिरुवनंतपुरम

हे ही वाचा –

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आणखी एका संघाची घोषणा, अचानक स्टार अष्टपैलूकडे सोपवलं कर्णधारपद; सगळेच चक्रावलं, पाहा Squad

आणखी वाचा

Comments are closed.