निवडणूक आयोगाने ‘पाडू’ मशीन आणलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल, मतदानाच्या एक दिवसाआधी काय घडलं?
राज ठाकरे बीएमसी निवडणूक 2026 मुंबई: मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या (15 जानेवारी) मतदान (BMC Election 2026) होणार आहे. मुंबईतील मतदानाआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही मुंबईतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. मात्र याचदरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)
सरकारला ज्या सुविधा हव्यात त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय- राज ठाकरे (Raj Thackeray On ECI)
आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये प्रचार झाल्यानंतर एक दिवसामध्ये वेळ असतो. आतापर्यंत मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार नव्हता. निवडणुकीची प्रथा मोडली. सरकारला जे हवं त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय. पत्रके वाटू शकत नाही पण पैसे वाटू शकतात का?, ही मुभा आताच का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. निवडणूक आयोग सरकारला जे काही हवं ते करत आहे. दिनेश वाघमारे कशावरही उत्तर द्यायला तयार नाहीत. सरकारला ज्या सुविधा हव्यात त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन की, आपापल्या विभागात लक्ष ठेवा. पैसे वाटप केलं जात आहे. आनंदाची गोष्ट की, काही जण त्याला विरोध करत आहे. निवडणूक आयोग याला मदत करतंय, हा आमचा आरोप आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं- (Raj Thackeray On PADU Machine)
निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. ते उद्या सगळीकडे ठेवलं जाणार आहे. ईव्हीएम बंद पडलं, तर हे मशीन वापरलं जाणार आहे. पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती. ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही?, असंही राज ठाकरे म्हणाले. नवीन मशीन राजकारण्यांना दाखवावंसंही नाही वाटलं. यात गडबड होणार नाही हे कशावरून?, ही कुठली बेबंदशाही सुरू आहे?, ही कसली लोकशाही?, असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. काय प्रकारचं राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय, अशी माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली.
PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही- भूषण गगराणी (BMC Election 2026)
PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक (इमरजेंसी) परिस्थितीमध्ये हे PADU मशीन वापरलं जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला सवाल- (Raj Thackeray On BMC Election 2026)
1. काल 5 वा. प्रचार संपला,आज प्रचाराला मुभा कशी दिली?
2. आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली?
3. मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याचे अधिसूचना आज का काढली?
4. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात ‘पाडू’ नावाचे नवे मशिन का जोडताय?
5. ‘पाडू’ नावाच्या मशिनबद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही?
6. सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का?
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.