क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित, अय्यर अन् जैस्वाल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून OUT… मुंबई क्रिकेटचा मोठ

मुंबई खेळाडूंसाठी MCA सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स: भारतीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेटने (MCA) आपल्या खेळाडूंच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या वरिष्ठ खेळाडूंसाठी ‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ जाहीर केले असून, यामध्ये प्रामुख्याने केवळ देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांना या करारातून वगळण्यात आले आहे.

बुधवारी झालेल्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये दिलीप वेंगसरकर इंटर-कॉलेज स्पर्धा, सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स आणि टी-20 स्काऊटिंग लीग यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, सीनियर संघातील खेळाडूंकरिता सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सुरू करण्याचा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. खेळाडूंच्या भविष्याचा विचार करता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

MCA कडून सीनियर खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (Mumbai Cricket Association Central Contracts)

एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत मुंबई क्रिकेट असोसिएशनने सीनियर संघातील खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय संघात खेळणारे तसेच आयपीएलमध्ये सहभागी असलेले खेळाडू या कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट असणार नाहीत. हे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट प्रामुख्याने उदयोन्मुख आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने खेळणाऱ्या सीनियर खेळाडूंसाठी असतील. यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि कोणतीही चिंता न करता खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.

MCA ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, “खेळाडूंच्या दीर्घकालीन विकासासाठी शीर्ष परिषदेनं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्सना मंजुरी दिली आहे. यामुळे उदयोन्मुख प्रतिभेला आर्थिक सुरक्षा आणि आवश्यक पाठबळ मिळेल.” याच बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, इंटर-कॉलेज क्रिकेट स्पर्धेला माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे नाव देण्यात येणार आहे.

T20 स्काऊटिंग स्पर्धेची सुरुवात

याशिवाय, मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून विशेष टी-20 स्काऊटिंग स्पर्धा आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेमुळे तरुण प्रतिभांचा शोध घेऊन त्यांना गुणवत्तेच्या आधारे एलीट स्तरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होईल. विशेषतः टी-20 फॉरमॅटसाठी खेळाडूंना घडवण्यावर भर दिला जाणार असून, मुंबई क्रिकेटचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याचा हा प्रयत्न आहे.

MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “हे निर्णय मुंबई क्रिकेटची समृद्ध परंपरा जपत तरुण पिढीला सक्षम करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे केवळ देशांतर्गत क्रिकेटच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही मुंबईच्या खेळाडूंची उपस्थिती अधिक भक्कम होईल.”

हे ही वाचा –

KL Rahul Century Celebration : खणखणीत शतक ठोकल्यावर केएल राहुलचं अनोखं सेलीब्रेशन, राजकोटमध्ये घडलं काहीतरी वेगळच, सगळेच थक्क, पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.