अजित पवारांच्या शहराध्यक्षांवर भाजपच्या महिला उमेदवाराचे आरोप, पालांडे-बहल वादाने राजकारण तापलं
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election : पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला शहराध्यक्षा आणि महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार सुजाता पालांडे यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा उमेदवार योगेश बहल यांच्या समर्थकांनी घुसखोरी केली आहे. यावेळी घरातील सदस्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पालांडे यांनी केला आहे. मात्र मला याची अजिबात कल्पना नाही. मी अशा गोष्टी करत नाही, असं म्हणत बहल यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र या घटनेमुळे राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
योगेश बहल यांच्या समर्थकांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी
सुजाता पालांडे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत यांनी या घटनेच्या निषेधार्थ संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले. योगेश बहल यांच्या समर्थकांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे दाखल झाल्या आहेत. त्यांनीही बहल समर्थकांना अटक करण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, कायदेशीर कारवाईबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये महानगर पालिकेत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. उद्या 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना पहायला मिळाला होता. या महापालिकेत एकूण 32 प्रभागातून 128 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. अशातच आता या महानगर पालिकेचा एक्झिट पोल समोर आला आहे. यात भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. PRAB च्या एक्झिट पोलनुसार पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. येथे भाजपला 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 51, शिवसेनेला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 1 आणि मनसेला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या महानगर पालिकेत पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे, हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी तळ ठोकला होता. पिंपरीत अजित पवारांना अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. तसेच भाजपावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता मतदारांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Exit Poll : राज्यातील 29 महापालिकांचा एक्झिट पोल, महायुती किती ठिकाणी जिंकणार? काँग्रेसला एकमेव महापालिका?
आणखी वाचा
Comments are closed.