ठाण्यात मतदान संपताच ज्याची भीती होती तेच झालं, मानपाड्यात मिनाक्षी शिंदें-भोईरांचा राडा

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026: ठाण्यातील मानपाडा परिसरात प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) आणि अपक्ष उमेदवाद भूषण भोईर (Bhushan Bhoir) यांच्या समर्थकामध्ये तुफान राडा झाला.  ठाण्यातील ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स येथील मतदान केंद्राबाहेर हा राडा झाला. ईव्हीएम मशीन पळवून नेण्यावरुन हा राडा झाला असून दोन्ही उमेदवारांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडल्याने या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना याठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. भूषण भोईर  यांनी बाहेरुन जमाव तसेच हत्यारं आणून कोणाला तरी जीवे मारण्याचा कट होता, असा आरोप माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. तर मीनाक्षी शिंदे समर्थकांकडून भूषण भोईर यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली असल्याचा आरोप भोईर समर्थकांकडून करण्यात आला आहे.

ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि शिवसेनेने तिकीट नाकारल्याने या ठिकाणी अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांचे पॅनल विरोधात उभे राहिले होते. सुरुवातीपासूनच या प्रभागात तणाव होता. निवडणुकीपूर्वी देखील मीनाक्षी शिंदे यांनी भूषण भोईर तसेच आगरी समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याची ऑडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.  अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्यावरदेखील त्यांच्या समर्थकांकडून पैसे वाटले जात असल्याचे आरोप अपक्ष उमेदवार तसेच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्या सगळ्यांचा खंडन करून भूषण भोईर यांनी सगळे आरोप फेटाळले.

आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर भूषण भोईर मतदान केंद्रात का आले यावरून  हा वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही उमेदवारांचे समर्थक मोठया प्रमाणात बाहेर जमा झाले. यावेळी काही वाहने फोडण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. तसेच मतपेटी घेऊन जाणारी बसदेखील अडवण्यात तसेच स्थानिक पोलिसांनी सुद्धा प्रकरण आणखी वाढू नये, यासाठी राज्य राखीव दलाची तुकडी बोलावून या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करून पांगवापांगवी करण्यात आली. त्यानंतरही मोठ्या संख्येने दोन्ही उमेदवारांचे समर्थक मतदान केंद्राच्या बाहेर जमले आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर या परिसरात आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये शांतते वातावरण करण्यासाठी मी पोहचलो आहे. महिला अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत काही प्रकार घडला आहे त्याबाबत माहिती घेण्यासाठी मी घटनास्थळी आलो आहे. ज्या ज्या ठिकाणी बोगस मतदान झाले आहे, त्याठिकाणी कारवाई झाली पाहिजे, असे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दोन गटांमध्ये जो काही वाद झाला होता, तो पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केलेला आहे. सध्या या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. सगळ्या मतपेट्या ते आता स्ट्राँगरूमला पोहोचले आहेत. उद्याची मतमोजणीची तयारीसाठी पोलिसांचा बंदोबस्तदेखील लावण्यात आलेला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच काजूवाडीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे, तोदेखील मार्गी लागलेला आहे, अशी माहिती परिमंडळ – 5 ठाणे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.

आणखी वाचा

‘मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन’, कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या…

आणखी वाचा

Comments are closed.