नाशिकमध्ये भाजपाच ‘धुरंधर’, महापालिकेत एकहाती सत्ता; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या
नाशिक निवडणूक निकाल 2026: नाशिक महापालिकेवर ‘शंभर प्लस’चा नारा देत मैदानात उतरलेल्या भाजपने अखेर 72 जागा जिंकत पुन्हा एकदा महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मनपात बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 62 जागांचा टप्पा ओलांडत भाजपने कोणाच्याही पाठिंब्याविना सत्ता मिळवली असून, ही निवडणूक भाजपसाठी ताकद सिद्ध करणारी ठरली आहे.
भाजपला आव्हान देत महापौर पदाचे स्वप्न पाहणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेला मात्र नाशिककरांनी अवघ्या 26 जागांवरच समाधान मानावे लागले. तर ठाकरे गटाने 15 जागा जिंकत आपली उपस्थिती ठळकपणे दाखवून दिली. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपने सहा जागांची वाढ करत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
Nashik Election Result 2026: मतदानात घट, भाजपला लाभ
यंदा एकूण मतदानाची टक्केवारी 57 टक्क्यांवर स्थिरावली असून, 2017 मधील 62 टक्क्यांच्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांची घट नोंदवली गेली. घटलेल्या मतदानाचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
Nashik Election Result 2026: प्रतिष्ठेची लढत आणि भाजपची कसोटी
ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी सभा घेत वातावरण निर्मिती केली, तर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये मुक्काम ठोकून संघटन मजबूत करण्यावर भर दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी नाकारल्याने पक्षातील निष्ठावंतांमध्ये नाराजी दिसून आली होती. त्यामुळे भाजपला फटका बसेल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, सर्व विरोधी अंदाज फोल ठरवत भाजपने पूर्ण ताकदीनिशी लढत 72 जागांचा पल्ला गाठला.
Nashik Election Result 2026: शिंदेसेनेच्या महत्त्वाकांक्षांना सुरुंग
महापालिकेत सत्ता मिळवण्याच्या उद्देशाने शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आक्रमक प्रचार केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा घेत नाशिककरांना सत्तेसाठी आवाहन केले. तरीही भाजपने नाशिकमधील आपला ‘बालेकिल्ला’ कायम राखत शिंदेसेनेच्या महत्त्वाकांक्षांना मोठा धक्का दिला. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेचा ठाकरे गटाला निश्चितच फायदा झाल्याचे निकालातून दिसून आले. 15 जागांसह ठाकरे गटाने शहराच्या राजकारणात आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे.
Nashik Election Result 2026: नाशिक महानगरपालिकेचा निकाल
एकूण जागा : 122
भाजप – 72
शिंदेंची शिवसेना – 26
ठाकरेंची शिवसेना – 15
राष्ट्रवादी अजित पवार – ०४
काँग्रेस – 03
मनसे – 01
अपक्ष – 01
Nashik Election Result 2026: या नगरसेवकांचा पहिल्यांदाच मनपात प्रवेश
यंदाच्या निवडणुकीत अमोल पाटील, संगीता घोटेकर, भारती धिवरे, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, विश्वास नागरे, समाधान देवरे, मानती शेवरे, सोनाली भंदुरे, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, राहुल शेलार, अदिती पांडे, मयुरी पवार, सामिया खान, नाझीया अत्तार, जागृती गांगुर्डे, सीमा पवार, रूपाली नन्नावरे, दीपाली गीते, संध्या कुलकर्णी, सुनिता भोजने, प्रमिला मैंद, योगेश भोर, रुचिरा साळवे, योगेश गाडेकर, प्रविण जाधव, रिद्धेश निमसे, नामदेव शिंदे, ऐश्वर्या लाड, इंदूमती खेताडे, जुई शिंदे, गौरव गौवर्धने, मोनिका हिरे, सागर लामखेडे, नीलम पाटील, चंद्रकला धुमाळ, प्रमोद पालवे, बाळू काकड, रोहिणी पिंगळे, चित्रा तांदळे यांना मनपा सभागृहात प्रथमच संधी मिळाली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.