भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 ला सादर केला जाणार आहे. यंदा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2026-27 ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या दिवशी एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार आहे.
रविवारी विशेष सत्र
नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं एक परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणं लाईव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जाणार आहे.
प्री- ओपन मार्केटचं कामकाज सकाळी 9.00 ते 9.08 दरम्यान असेल. त्यानंतर कामकाज सकाळी 9.15 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुरु राहील. बीएसईनं देखील 1 फेब्रुवारीला विशेष कामकाज दिवस जाहीर केलं आहे. बीएएसईवर एक फेब्रुवारीला नियमित कामकाज सुरु राहील, असं सांगण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून जाहीर केल्या जाणाऱ्या आर्थिक निर्णयांचा फायदा व्हावा म्हणून विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या माहितीनुसार केंद्रीय अर्थसंकल्प निश्चित कार्यक्रमाप्रमाणं 1 फेब्रुवारीला सादर केला जाईल. रविवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या तारखेत कोणताही बदल केला जाणार नाही. यामुळं अर्थसंकल्पाबाबत सुरु असलेल्या तर्क वितर्कांना पूर्णविराम लागला आहे. कॅबिनेट कमिटी ऑन पार्लियामेंट्री अफेअर्सच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी देण्यात आली आहे.
28 जानेवारी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करतील
29 जानेवारी: संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल.
1 फेब्रुवारी (रविवार): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी 2 वेळा अंतरिम आणि 6 वेळा नियमित अर्थसंकल्प सादर केला आहे. या वेळी निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताच त्या प्रणव मुखर्जी यांना मागं टाकतील. पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.
विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षात पहिल्यांदा रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यामुळं अर्थसंकल्प राजकीय आणि आर्थिक दृष्टया महत्त्वाचा ऐतिहासिक मानला जात आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.