ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबईबाबी). महापालिका निवडणुकीत भाजपने दैदिप्यमान यश मिळवले असून ठाकरेंची शिवसेना (Shivsena) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुंबईच्या महापौर पदावर महायुतीचा विजयी उमेदवार बसणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. कारण, गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या सभागृहात ठाकरेंच्या महापौरांचा आवाज घुमलाय. मात्र, यंदा हेच माजी महापौर विरोधकांच्या भूमिकेतून पालिकेत असणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या सभागृहात भाजप महायुतीचा महापौर झाल्यास त्यांना ठाकरेंच्या 4 माजी महापौरांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे, मुंबई महापालिकेकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
मुंबई पालिका निवडणुकांसाठी विविध प्रभागातील तिरंगी लढतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चार माजी महापौर व एक माजी उपमहापौरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. या सर्व उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत पुन्हा पालिका सभागृहात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या महापौरांना या अनुभवी महापौरांचा सभागृहात सामना करावा लागणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने या निवडणुकीत माजी महापौर मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव व किशोरी पेडणेकर यांना रिंगणात उतरवले होते. तसेच माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर व माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनाही पुन्हा संधी दिली होती. फणसे यांनी 6,610 मते घेऊन प्रभाग 59 मधून भाजपचे माजी नगरसेवक बोगिराज दाभाडकर यांचा पराभव कला. दाभाडकर यांना 6,237 मते मिळाली आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोरांचा पराभव
प्रभाग 182 मधून मिलिंद वैद्य यांनी भाजपच्या राजन पारकर यांचा प्रभाव केला आहे. वैद्य यांनी 14,248 मते घेत पारकर यांच्यावर 9,854 मतांनी विजय मिळविला आहे. तर दादरच्या 191 प्रभागातून विशाखा राऊत यांनी माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला. प्रभाग 202 मध्ये माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्याने नाराजी पसरली होती.
शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, जाधव यांच्यावर मतदारांनी पुन्हा विश्वास दाखवत भाजपचे पार्थ बावकर व इंदुलकर यांचा पराभव केला.
हेमांगी वरळीकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय
वरळीमध्ये माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनाही पदाधिकाऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागले होते. त्यांच्याही विरोधात शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी अर्ज भरला होता. तर, शिंदेसेनेचे प्रल्हाद वरळीकर यांचे त्यांच्यासमोर आव्हान होते. मात्र, वरळीकर यांनी दोघांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या सर्व अनुभवी नेत्यांच्या यशामुळे पालिका सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आक्रमक व प्रभावशाली असणार आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेतील राजकीय घडामोडी अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
आणखी वाचा
Comments are closed.