ह्रदयद्रावक… अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; 2 ठार 3 जखमी
गडचिरोली : अंत्यविधी आटोपून चारचाकी वाहनाने घरी जात असताना वाहन नदीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दोघे ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. गडचिरोलीच्या (Gadchiroli) अहेरी तालुक्यातील खमनचेरू-बोरी दरम्यान असलेल्या दीना नदी पुलावर मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली. यादव विठ्ठलराव कोलपाकवार (73) आणि सुनील मुरलीधर कोलपाकवार (55) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे असून अभिजीत यादव कोलपाकवार (40), अर्चना यादव कोलपाकवार आणि पद्मा सत्यनारायण कोलपाकवार हे तीन जण गंभीर जखमी आहेत.
अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळा घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. तसेच, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातातील जखमींना उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आले आहे. नागेपल्ली येथील आरडी एजंट रवींद्र तंगडपल्लीवार यांचा काल सिरोंचा मार्गावर खून झाला होता. पोलिसांनी मोक्यावर जात पंचनामा करून सायंकाळी उशिरापर्यंत शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांना मृतदेह सोपविला. त्यानंतर, तंगडपल्लीवार यांच्यावर आज नागेपल्ली येथे अंत्यविधी पार पडले. या अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी हजेरी लावली होती.
यादव कोलपाकवार, पत्नी अर्चना कोलपाकवार आणि मुलगा अभिजित कोलपाकवार, सुनील कोलपाकवार, पद्मा कोलपाकवार हे पाचही जण अंत्यविधी आटोपून आपल्या चारचाकी वाहनाने आष्टीकडे निघाले होते. दरम्यान दीना नदीच्या पुलावरून वाहन कोसळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. लगेच त्यांना उपचारार्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान यादव कोलपाकवार आणि सुनील कोलपाकवार यांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी आहेत. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.