कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यासाठी 12 हेक्टर 76 आर जमीन देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अशातच यासंदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या विकासवाडीमध्ये साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव दिलं जाणार आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापुरातील विकासवाडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी कालच मंत्रिमंडळ बैठकीत 12 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याची माहिती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी प्रस्तावित जागेपेक्षा अधिकची जागा अजितदादांच्या सूचनेनुसारच दिली गेल्यानं या स्टेडियमला अजितदादांच नाव दिले जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, क्रीडाप्रेमी नागरिकांकडून स्वागत
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम होणार असल्यानं या निर्णयाचे क्रीडा नगरी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी, क्रीडाप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यापासून अनेक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा सुरू होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस या निर्णयास मंजुरी देण्यात आल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी मिळणार
यापूर्वी 80 च्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना रंगला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना कोल्हापुरात झालेला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम नसल्याने कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत नव्हते. त्यामुळे विकासवाडीत जागेसाठी पाठपुरावा सुरू होता त्याला अखेर यश आले आहे. हे स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.