‘मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात…’, अजित पवारांच्या विमान अपघातावरील रोहित पवार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात असल्याचा खळबळजनक संशय अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. मुंबईसह दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर सादरीकरण करत या अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी विमान भाड्याने देणाऱ्या व्हीएसआर कंपनीसह संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक तज्ज्ञांमार्फत आणि विशेषतः फ्रान्स, अमेरिका किंवा युकेमधील तज्ज्ञ एजन्सींकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी रोहित पवारांनी (Rohit Pawar) अनेक प्रश्नही उपस्थित केले, यानंतर आता अजित पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देखील रोहित पवारांच्या संशयावरती प्रतिक्रिया व्यक्त करत याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे.

त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर

अमोल मिटकरी यांनी याबाबतची एक पोस्ट सोशल मिडीयावरती शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, आमदार श्री रोहित पवारांची पत्रकार परिषद बघितल्यावर मी ज्या काही शंका उपस्थित केल्या होत्या त्यात कुठेतरी तथ्य असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रोहित पवारांनी मागणी केल्याप्रमाणे तत्काळ एका बाह्य संस्थेकडून सदर प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना नुकतच याबाबत मी स्वत:भेटून पत्र दिले आहे. माननीय मुख्यमंत्री त्यांच्या अत्यंत जवळच्या व तितक्याच विश्वासु मित्राच्या घातपाती मृत्यु व त्यामागील षडयंत्राचा छडा लावल्याशिवाय शांत बसणार नाहीत याबद्दल माझ्या मनात दुमत नाही”, असंही त्यांनी पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कॅप्टन कपूर यांच्या पार्श्वभूमीवर प्रश्न

कॅप्टन कपूर यांच्या पूर्वीच्या नोंदींबाबत शंका उपस्थित करत रोहित पवार यांनी सांगितले की, त्यांच्यावर यापूर्वी शिस्तभंग आणि मद्यप्राशनासंबंधी वाद झाले होते. अशा परिस्थितीत व्हीआयपी उड्डाणासाठी त्यांची नियुक्ती का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी विचारला.पायलट बदलण्यामागे ‘वाहतूक कोंडी’चे कारण दिले गेले. मात्र, इतक्या पहाटे मुंबईत ट्रॅफिक जाम असणे शक्य नाही, असे म्हणत त्यांनी या कारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रोहित पवार यांनी काही तांत्रिक मुद्द्यांवरही स्पष्टीकरण मागितले

* अपघातापूर्वीच्या शेवटच्या एका मिनिटात नेमके काय घडले?
* विमानाचा ट्रान्सपोंडर का बंद होता?
* रनवे ११ वर उतरवण्याचा प्रयत्न का झाला? रनवे २९ निवडला असता दुर्घटना टळली असती का?
* डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ५००० मीटर दृश्यमानता आवश्यक असताना ३००० मीटरवर लँडिंग का करण्यात आली?
या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरे मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशीची मागणी

“या घटनेबाबत कोणाच्याही मनात शंका राहू नये. त्यामुळे स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी होणे अत्यावश्यक आहे,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. सत्य बाहेर येणे हीच दिवंगत नेत्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

शेवटच्या क्षणी पायलट बदल का?

दुर्घटनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही पायलटांची शेवटच्या क्षणी झालेली अदलाबदल, असे रोहित पवार यांनी म्हटले. मूळ नियुक्त पायलटांना हटवून दुसऱ्या पायलटांची नेमणूक का करण्यात आली, याबाबत स्पष्टता हवी आहे. तसेच, बदललेल्या पायलटांपैकी एक जण हाँगकाँगहून नुकताच परतला होता, ही बाबही संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

उड्डाणापूर्वी अनिवार्य असलेली वैद्यकीय तपासणी आणि अल्कोहोल चाचणी योग्य प्रकारे करण्यात आली होती का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “मुख्य पायलट शेवटच्या क्षणी का बदलला? हा निर्णय नेमका कुणी आणि का घेतला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पायलटची पार्श्वभूमी आणि तांत्रिक त्रुटींची शंका

रोहित पवार यांनी संबंधित पायलटच्या पूर्वीच्या नोंदींचाही उल्लेख केला. अल्कोहोल चाचणीत अपयश आणि प्रशिक्षण सत्रे चुकवण्याच्या घटना पूर्वी घडल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे कंपनीतील अंतर्गत संवाद आणि पायलटच्या फिटनेसबाबतची कागदपत्रे तपासावीत, अशी मागणी त्यांनी केली.दुर्घटनेदरम्यान कोणताही ‘डिस्ट्रेस कॉल’ करण्यात आला नाही, तसेच विमानाचा ट्रान्सपोंडर कार्यरत नव्हता, ही बाबही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. विमानाची नियमित देखभाल झाली होती का, त्याच्या उड्डाणक्षमतेला प्रमाणपत्र कोणी दिले, तसेच देखभाल नोंदी सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

ऑपरेटरचा रेकॉर्ड आणि SOP उल्लंघनाचा मुद्दा

विमानाचे वय, ऑपरेटरचा पूर्वीचा सुरक्षा रेकॉर्ड आणि मानक कार्यपद्धतींचे पालन झाले होते का, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. पायलटचे ड्युटी तास, इंधन व्यवस्थापन, देखभाल पद्धती आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता यांची सखोल चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी संबंधित ऑपरेटरकडून घडलेल्या घटनांचे अहवाल सार्वजनिक का करण्यात आले नाहीत, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आंतरराष्ट्रीय संस्थांकडून चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, वेळबद्ध आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी करत रोहित पवार यांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संस्थांचा सहभाग घ्यावा, असे सुचवले. केवळ पारदर्शक तपासच सर्व शंका दूर करू शकतो आणि कोणत्याही गैरप्रकाराची शक्यता नाकारू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

Comments are closed.