टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा

छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समकक्ष मानले गेले पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केले. मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाच्या (Tipu Sultan) छायाचित्रावरुन वाद निर्माण झाला असताना हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने या आगीत आणखी तेल ओतले जाण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्याप्रकारचं आहे, त्यांनी जो स्वराज्या विचार दिला, त्याच मांदियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे युद्ध होऊ गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले.

यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतही भाष्य केले. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात 50 हजाराची लाच घेतली, हे प्रकरण फार छोटं आहे. हे संपूर्ण सरकारच लाचखोर आहे. नरहरी झिरवल यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे पण  कोट्यावधी रुपये खाणारे देवेंद्र फडणवीसनवर काय कारवाई करणार हे आधी सांगा, या असंवैधानिक सरकारचा आम्ही निषेध करतो. अजितदादा आता राहिले नाही शरद पवार आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत, त्यांचा पक्ष त्यांच्या विचाराने चालेल का? तटकरे आणी पटेल हा पक्ष चालवणार आहेत हा कळीचा मुद्दा आहे. पटेल यांचा तो मी नव्हेच म्हणण्याचा जुना स्वभाव आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्र समोर आलं. अजित दादा हे चांगले प्रशासक होते.  त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील लोकांनी लूट करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.

भूम परंड्यात सहा महिन्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी आले. हे वरातीमागून घोडे आहे आणि आता शेतकऱ्यांना ते वाटाण्याच्या अक्षता लावून निघून जातील. मुनगंटीवारांचा बंगला घेण्याइतपत माझी ऐपत नाही. मात्र, रेडी रेकनरच्या दरात ते जर बोलत असतील तर मी त्यांना कळवेल. 17, 18 फेब्रुवारी रोजी आमची दोन दिवस बैठक आहे. संघटना बांधणीच्या हिशोबाने व पुढील वर्षभरात काँग्रेसने कोणत्या दिशेने वाटचाल करावी यासाठी ही बैठक आहे. संघटनात्मक बाबींची चर्चा आम्ही पक्षाच्या बैठकीत करू. अमेरिकेशी केलेल्या करारामुळे शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही नरेंद्र सरेंडर हे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास लावल्यावरच शांत बसतील. महाविकास आघाडीत लवकरच संवादाची गरज आहे. भाजपाला विरोध म्हणून लवकरच हा संवाद घडून यायला हवा, अशी अपेक्षा यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा

उपमहापौरांच्या दालनात झळकला टिपू सुलतानचा फोटो; शिवसेना-हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मालेगावात राजकारण तापलं!

आणखी वाचा

Comments are closed.