भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्

भिवंडी महानगर पालिका महापौर निवडणूक 2026: भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युतीत लढणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निकालानंतर वेगळ्या धोरणाचा अवलंब गेल्याने सध्या येथील महापौरपदाच्या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. भिवंडी महानगरपालिकेत भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या. मात्र, शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीला सोबत घेऊन भिवंडीत आपला महापौर बसवण्याची तयारी सुरु केली होती. मात्र, माजी महापौर आणि कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांना एका जुन्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भिवंडीतील गेम बिघडणार असे दिसत होते. परंतु, विलास पाटील यांच्या अटकेनंतरही शिवसेना महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भिवंडी महानगरपालिकेत कोणार्क विकास आघाडीचे जेमतेम चार नगरसेवक निवडून येत असले तरी सत्तास्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची असते. यंदा कोणार्क विकास आघाडीने शिवसेनेसोबत जायचे ठरवल्याने भिवंडी महानगरपालिकेत 22 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपला महापौरपदापासून दूर राहावे लागणार, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, विलास पाटील यांच्या अटकेमुळे हे समीकरण बदलले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विलास पाटील हे सोमवारी पोलीस बंदोबस्तात महापौरपदाचा अर्ज भरु शकतात. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bhiwandi News: भिवंडीत महायुतीमध्ये फूट, भाजपापाठोपाठ शिवसेनेकडून महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढवण्याची तयारी

भिवंडी महापालिका निवडणुकीत कोणत्याच राजकीय पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे व तब्बल एक महिन्यानंतर ही कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराकडून संख्याबळाचे गणित जुळून येण्यात अपयश आल्यामुळे भाजपा व शिवसेना या महायुतीतील दोन पक्षात फूट पडली  असल्याचे समोर येत आहे. सोमवार 16 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी महायुतीतील भाजपापाठोपाठ शिवसेनेनेसुद्धा महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेना पक्षनेते प्रकाश पाटील यांनी जाहीर केले आहे. या घोषणेनंतर भिवंडी पालिकेतील सत्तेची  समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असून त्यामध्ये कोण यशस्वी होणार, हे 20 फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजपा व शिवसेनेने महायुती म्हणून लढवली होती. यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते. परंतु बहुमतासाठीचा 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौरपदासाठी  जुळवाजुळव सुरू केली. त्याचदरम्यान विलास पाटील यांना आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केल्याने भाजपा व शिवसेना यांच्यातील वितुष्ट समोर आले. त्यानंतर भाजपाने महापौर पदासाठीची निवडणूक लढवत असल्याचे घोषित केले. त्यापाठोपाठ शिवसेना पक्षाने सुद्धा महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले आहे.

भिवंडीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने अनेकांकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने भिवंडी पालिका महापौर व उपमहापौर पदासाठीच्या दोन्ही निवडणुका शिवसेना लढवत आहे. शिवसेना पक्षाचा हा निर्णय भाजपला कळवण्यात आला आहे. प्रयत्न तर दोघांकडून सुरू होते. मात्र, अंतिम निर्णय होऊ न शकल्याने भाजपा त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवेल तर शिवसेना आपल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे. विलास पाटील आमच्यासोबत आले असताना त्यांना अटक झाली. त्यानंतरही पक्षाने भूमिका ठाम ठेवली असून उमेदवार कोण असेल हे उद्या पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्यांचे नाव येईल, ते उमेदवार असतील, अशी माहिती पक्षनेते प्रकाश पाटील यांनी दिली.

Bhiwandi MahanagarPalika Election: भिवंडी महानगरपालिकेतील संख्याबळ

एकूण जागा-90

काँग्रेस-30
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-12
भाजप-22
शिवसेना-12
कोणार्क विकास आघाडी-4
समाजवादी पक्ष-6
अपक्ष-1

आणखी वाचा

भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड, ‘किंगमेकर’ विलास पाटलांना पोलिसांनी उचललं, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.