वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या अंडर 19 संघाचा आक्रमक खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) दहावीची परीक्षा यंदा देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकांनी ही माहिती दिल्याचं सांगितलं जातंय. वैभव सूर्यवंशी दहावीची परीक्षा देणार की नाही यासंदर्भातील चर्चांना यामुळं ब्रेक लागला आहे.
Vaibhav Sooryavanshi : वैभव दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार
वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या ताजपपूरमधील रहिवासी आहे. मॉडेस्टी स्कूलमध्ये तो शिक्षण घेतोय. वैभव सूर्यवंशी दहावीला असून त्याची परीक्षा 17 फेब्रुवारीला सुरु होणार असून 11 मार्चला संपणार आहे. मात्र, वैभव सूर्यवंशी परीक्षा देणार नसल्याचं समोर आलं आहे. 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीनं भारताकडून अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप आणि भारत अ संघाकडून क्रिकेट खेळलं आहे, ज्यामुळं त्याला दहावीच्या परीक्षेच्या तयारीसाठी कमी वेळ मिळाल्याची माहिती आहे.
वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी हिंदूस्थान टाइम्स सोबत बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले की तो (वैभव) दहावीची परीक्षा देणार नाही. तो सध्या नागपूरमध्ये असून आगामी आयपीएलची तयारी करत आहेत. राजस्थान रॉयल्सच्या संघासोबत तो असून प्री सीझन कॅम्पमध्ये सहभागी झालाय, असं मनीष ओझांनी म्हटलं. आयपीएल 26 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून खेळत असून तो महत्त्वाचा फलंदाज आहे.
मॉडेस्टी स्कूल ताजपूरचे संचालक आदर्श कुमार पिंटू यांनी म्हटलं की वैभव सूर्यवंशीचा परीक्षा अर्ज दाखल करण्यात आला असून प्रवेशपत्र देखील जारी करण्यात आलं आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूल हे वैभव सूर्यवंशीसाठी परीक्षा केंद्र होतं. वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्यांच्या लेकासाठी क्रिकेट हे पहिलं प्राधान्य असल्याचं म्हटलं आहे.
संजीव सूर्यवंशी यांच्या मते वैभवचं पूर्ण लक्ष्य क्रिकेटवर आहे. तो प्रशिक्षणात व्यस्त असून तो 17 फेब्रुवारीपासून सुरु होणारी परीक्षा देणार नाही. तो पुढील वर्षी परीक्षा देईल, असं संजीव सूर्यवंशी म्हणाले. याबाबतचं वृत्त ईटीव्ही भारतनं दिलं आहे.
दरम्यान, वैभव सूर्यवंशीनं नुकत्याच पार पडलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 80 बॉलमध्ये 175 धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीनं या वर्ल्ड कपमधील 7 मॅचमध्ये 439 धावा 62.71 च्या सरासरीनं आणि 169.49 च्या स्ट्राईक रेटनं केल्या होत्या. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वैभवच्या नावावर नोंद झाला आहे.
आयपीएलच्या 2025 हंगामात वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयलन्सनं 1.1 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. वैभवनं गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या हंगामात 7 सामन्यात 252 धावा केल्या होत्या.
आणखी वाचा
Comments are closed.