राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; ‘या’ तारखेला होणार घोषणा

मुंबई : राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी होणार याचीही उत्सुकता सर्वांनाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानुसार, पदभार स्वीकारत कामाला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे, आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड कधी होणार, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा आणि उत्सुकता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेत्यांनीही लागली आहे. त्यातच,आज सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीख आणि नाव ठरलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख ठरली असून 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरुन दोन्ही राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणि आमदार, खासदारांमध्ये काही प्रमाणात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भाने चर्चा करण्यात आली असून 26 फेब्रुवारी रोजी ही निवड करण्यात येणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांचे नाव आघाडीवर होते, त्यातच केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनीही एका मुलाखतीत त्यांचं नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू होती. मात्र, आता राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांचेच नाव निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.

विलिनीकरणावर माध्यमांत चर्चा नको

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत विलिनीकरणाच्या संदर्भात तूर्तास चर्चा नाही. विलिनीकरणाच्या संदर्भात बाहेर माध्यमांमध्ये बोलू नये अशा सूचना बैठकीत आमदारांना दिल्या आहेत. पक्ष संघटना वाढ, राष्ट्रीय अध्यक्ष निवड आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भातील चर्चा आजच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे.

नरेश अरोरांच्या बंधुंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सर्किट हाऊस येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर विजयी झालेल्या सदस्यांच्या भेटीसाठी घेत आहेत. तेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांचे बंधू सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते, पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. या भेटीत देखील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवडीची चर्चा झाली होती. त्यानंतर, आता तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा

Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर

आणखी वाचा

Comments are closed.