घोसाळकर, जाधव, शर्मा, नार्वेकर, खान…; मुंबई महापालिकेच्या समित्यांवर कोणाकोणाला संधी?, A टू Z

BMC सुधारणा समिती सदस्य: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांची निवड जाहीर (BMC Improvements Committee Members) करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट या चार महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवरील नियुक्त्यांमधून राजकीय समतोल साधतानाच पक्षांतर्गत समीकरणे आणि नातेवाईकांना दिलेल्या संधीची चर्चा रंगली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांची सुधार समितीवर तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राखी जाधव यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले चंदन शर्मा यांनाही सुधार समितीवर स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या नेत्यांना महत्त्वाच्या समित्यांवर संधी देण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (BMC Election 2026)

महापौरपदाच्या चर्चेत असलेल्या राजेश्री शिरवडकर यांना शिक्षण समितीवर पाठवण्यात आले आहे. याशिवाय शिक्षण आणि बेस्ट समित्यांवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करत काही बिगर नगरसेवकांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे. दरम्यान, काही प्रभावी नेत्यांच्या नातेवाईकांनाही समित्यांवर संधी देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. एकूणच, समित्यांवरील या नियुक्त्यांमधून अनुभवी सदस्यांना संधी देतानाच पक्षांतर्गत संतुलन राखणे, नव्याने आलेल्या नेत्यांना बळ देणे आणि काही ठिकाणी नातेवाईकांनाही स्थान देणे अशी राजकीय मांडणी दिसून येत आहे.

शिवसेना (शिंदे)–राष्ट्रवादी आघाडी मजबूत; दोन्ही गटांना समित्यांवर संधी- (Shivsena Shinde Group And NCP BMC Election 2026)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेच्या समीकरणात महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष या दोन्ही गटांनी एकत्र येत संयुक्त गट स्थापन केला होता. आता या आघाडीचा परिणाम समित्यांच्या नियुक्त्यांमध्येही दिसून आला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे मिळून चार नगरसेवक असून त्यांनाही विविध महत्त्वाच्या समित्यांवर संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या डॉ. सईदा खान यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायी समिती आर्थिक निर्णयांसाठी महत्त्वाची- (BMC Improvements Committee Members)

स्थायी समिती ही आर्थिक निर्णयांसाठी महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे ही नियुक्ती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अजित रावराणे यांना सुधार समितीवर पाठवण्यात आले आहे. शहरातील विकासकामे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित निर्णय सुधार समितीमार्फत घेतले जातात. महानगरपालिकेतील सत्ताधारी समीकरण अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समन्वय साधत या नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात समित्यांमधील कामकाज आणि निर्णयप्रक्रियेवर या आघाडीचा प्रभाव दिसून येणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC : एकच नगरसेवक असतानाही ‘या’ पक्षाची सुधार समितीमध्ये वर्णी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहयोगी गट

आणखी वाचा

Comments are closed.