मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखव

मुंबई: मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी मेट्रो बांधकामाच्या दरम्यान गंभीर अपघात घडला. एलबीएस रोड (LBS Road) वरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून (Mumbai Accident Metro Slab Collapsed) खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Mumbai Accident Metro Slab Collapsed) या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे, अशातच मनसे नेते अमित ठाकरे यांनी याबाबत संतापजनक पोस्ट शेअर केली आहे.

अमित ठाकरेंची पोस्ट काय?

अमित ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलंय की, “मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा ‘अपघात’ नाही, तर प्रशासनाने केलेला ‘खून’ आहे! निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला ‘जुगाड’ आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष… याची जबाबदारी कोण घेणार?”, अशा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

“एकीकडे सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचे स्लॅब कोसळत असताना, दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला ‘जिविताची हमी’ आणि सर्व ‘मूलभूत सोयी’ मिळाल्या आहेत; आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी रुपये उधळायचे आणि जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं?”, असंही पुढे अमित ठाकरे म्हणालेत.

“दुर्दैवाने, हा काही पहिलाच ‘अपघात’ नाही. अशा अनेक घटना मुंबईकरांच्या जीवावर बेतल्या आहेत. कधी पूल कोसळतो, कधी होर्डिंग तर कधी बांधकामाचे स्लॅब अंगावर पडून निष्पाप लोकांचे प्राण जातात. जास्तीत जास्त चौकशीचे आदेश दिले जातात, पण परिस्थिती बदलत नाही. अनियंत्रित गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे लोकांचे जाणारे प्राण याची तर सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही! धक्कादायक बाब म्हणजे, मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड होतो, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त ५ लाखांची शुल्लक मदत ? एखाद्या कुटुंबाची राखरांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी ‘शून्यात’ गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही?”, अशा शब्दात ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

“नुकतीच अमेरिकेतील एका अपघाताची बातमी आपण वाचली. तिथल्या प्रशासनाच्या चुकीमुळे एका भारतीय मुलीचा मृत्यू झाला, तेव्हा तिथल्या सिस्टीमने जबाबदारी स्वीकारून कोट्यवधींची भरपाई दिली. प्रगत राष्ट्रांमध्ये माणसाच्या जिवाला किंमत असते, पण आपल्याकडे? आपल्याकडे लोकांच्या जिवापेक्षा सरकारला ‘इव्हेंटबाजी’ महत्त्वाचे वाटते. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत, तर दर्जेदार रस्ते हवे आहेत! मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या ‘इनोव्हेटिव्ह स्टंट’साठी नाही, तर एका सुरक्षित आयुष्यासाठी… त्यामुळे हे असले ‘म्युझिकल’ नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची ‘बेसिक’ मागणी पूर्ण करा.जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवा !”, अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.