राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावल
रोहित पवार आणि अजित पवार: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 35 आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांचे नाव सुचवले. तसेच राष्ट्रवादीतील 32 ते 33 संघटनांच्या प्रमुखांनीही राष्ट्रीय अध्यक्ष या सुनेत्रा पवारच (Sunetra Pawar) असाव्यात, असा प्रस्ताव मांडला आहे. मला प्रसारमाध्यमांद्वारे ही गोष्ट समजली. सुनेत्रा काकींच्या नावाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाठिंबा देणारे 35 आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. आमचाही सुनेत्रा काकींना बाहेरुन पाठिंबा आहे, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नरहरी झिरवळ यांनी राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडली होती. झिरवळ (Narhari Zirwal) यांना भीती घालण्यासाठी त्यांच्याबाबत तो प्रकार घडलेला नाही ना? तुम्ही एका आमदाराला भीती घालू शकता पण 35 आमदारांना भीती कशी घालू शकता, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. (Maharashtra Politics News)
यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील अंतर्गत घडामोडींविषयी सविस्तरपणे भाष्य केले. आम्ही सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबवली आहे. आता तेच याबाबत चर्चा करत आहेत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, ते आमदारांना बैठकीला बोलवतात, एका रांगेत बसवून सांगतात की, विलीनीकरणाबाबत बोलू नका, असा दावा रोहित पवार यांनी केला. आमच्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपलेला आहे. अजितदादा असताना आमच्यात काय चर्चा झाली होती, हे आम्हालाच माहिती आहे. आम्ही दादांसोबत एनडीए आघाडीत सामील व्हायचे की, अजितदादा सत्तेच्या बाहेर येऊन आमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढणार होते, या विषयाबाबत दादा आणि आमच्यात चर्चा झाली होती. पण आज अजितदादा नाहीत. त्यामुळे आता या सगळ्याविषयी चर्चा करणे गौण आहे. त्यामुळे या विषयाला आमच्याकडून पूर्णविराम लागला आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. अजितदादा गेल्यानंतर लगेच चर्चा सुरु झाल्या. काही नेत्यांचं राष्ट्रवादीतील महत्त्व टिकून राहावे, यासाठी हे नेते मुद्दाम पवार साहेब आणि सुप्रिया ताईंना विरोध करत आहेत. विलीनीकरणाची चर्चा होत राहिली आणि आपण शरद पवार, सुप्रिया सुळेंना विरोध केला तर आपले महत्त्व टिकून राहील, असे या नेत्यांना वाटत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
NCP Merger news: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाबाबत रोहित पवार काय म्हणाले?
अजितदादा आम्हाला भेटायचे तेव्हा बहुतेकदा ते जयंत पाटील यांच्या घरीच भेटायचे. जयंत पाटील यांच्या घरासमोर लोढा साहेबांचे घर आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. गेल्या दीड वर्षातील सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा, म्हणजे अजितदादा आम्हाला कितीवेळा भेटले हे कळेल. अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाला आहे. तो आता तपासासाठी भारताबाहेर पाठवला जाणार आहे. सध्या आमच्यासाठी अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास महत्त्वाचा आहे. ती चौकशी होणे महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी राजकारण आणि विलीनीकरण हे दुय्यम आहे. त्यामुळे मी पत्रकार परिषद घेत नाही. नाहीतर अजित पवार आणि आमच्यात काय चर्चा झाली होती, याचे फोनभरुन पुरावे आहेत, मेसेज आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.