एलआयसीची मोठी खेळी, TCS आणि एचसीएल टेकमधील भागीदारी वाढवली, बँकांमधील गुंतवणुकीत कपात
मुंबई: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं आयटी कंपन्यांमधील गुंतवणूक वाढवली आहे. ज्यावेळी इतर गुंतवणूकदार आयटी स्टॉक्समधून पैसे काढून घेत आहेत, त्यावेळी एलआयसीनं टीसीएस आणि एचसीएल टेकमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. मनीकंट्रोल हिंदीच्या वृत्तानुसार याचवेळी बँकिंग स्टॉक्समधील गुंतवणूक कमी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आयटी कंपन्यांचे शेअर कोसळत असल्याचं पाहायला मिळालं होतं. टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक, टेक महिंद्राच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचा पाहायला मिळालं. गेल्या एक महिन्यात निफ्टी आयटी निर्देशांक 16 टक्क्यांनी घसरला आहे.
एलआयसीनं आयटी स्टॉकमधील गुंतवणूक वाढवली
एलआयसी देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. एलआयसीनं देशातील 283 कंपन्यांच्या शेअरमध्ये 17.83 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. डेटाबेसच्या माहितीनुसार एलआयसीनं डिसेंबर तिमाहीत टीसीएसचे 3136 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत. तर, एचसीएल टेकच्या 2293 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. एलआयसीनं कोफोर्जमध्ये देखील गुंतवणूक वाढवली आहे. यामुळं एलआयसीनं आयटी कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणूक 2.17 लाख कोटी केली आहे.
एलआयसीच्या एकूण गुंतवणुकीत आयटी स्टॉक्सचा वाटा 11.32 टक्क्यांवरुन 12.43 टक्के झाला आहे. डिसेंबर तिमाहीतील उच्चांकाच्या तुलनेत आयटी स्टॉक 30 टक्क्यांनी घसरले आहेत. आयटी स्टॉकच्या घसरणीचं कारण अँथ्रोपिकनं लाँच केलेली नवी एआय टूल्स हे आहे. आयटी कंपन्या करत असलेली काम अँथ्रोपिक एआय टूल्सकडून केली जातात. अँथ्रोपिकची दोन एआय टूल लाँच झाल्यानंतर आयटी कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
एलआयसीनं डिसेंबर तिमाहीत आयटी स्टॉकमधील गुंतवणूक वाढवली असल्याचं पाहायला मिळालं.त्याचवेळी बँकिंग स्टॉकमधील गुंतवणूक एलआयसीनं कमी केली आहे. एलआयसीनं स्टेट बँकेचे 3080 कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. एचडीएफसी बँकेच्या 1528 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या 1173 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री एलआयसीनं केली. यामुळं वित्तीय शेअर्समधील एलआयसीची भागीदारी 27.21 टक्क्यांवरुन 26.52 टक्क्यांवर आली आहे. डिसेंबरमध्ये एलआयसीची वित्तीय शेअरमधील गुंतवणूक 4.64 लाख कोटी रुपये होते.
एलआयसीनं एल अँड टीमधील 2442 कोटी रुपयांचे शेअर्स, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 2367 कोटी रुपयांच्या स्टॉक्सची विक्री केली आहे. हिंडाल्कोमधील 2307 आणि वेंदाताच्या 1491 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. एलआयसीनं अदानी पोर्टस आणि मारुती सुझुकीच्या शेअरमधील गुंतवणूक कमी केली आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.