राज्यसभा, विधान परिषदेवरून मविआत संघर्षाची ठिणगी; उमेदवार ठरवण्यावरून मतमतांतरं, नेमकं काय घडतं

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक 2026 वर महाविकास आघाडी: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहात आहेत. सात जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला दोन्हीकडे एकेक जागाच संख्याबळानुसार येत आहे. मात्र या एकेक जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्हं दिसत आहेत. मविआत सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं समजतंय. मात्र  शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठवावं यालाही शिवसेना राजी आहे अशी माहिती आहे.

विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवावं, यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. मात्र दुसरीकडे नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेस दुसरी भूमिका मांडत आहे. विलिनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय. त्यामुळे मात्र महाविकास आघाडीकडून राज्यसभेला कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार द्यायचा आणि विधान परिषदेसाठी कोण उमेदवार द्यायचा यासाठी एकत्रित बैठक होण्याआधी पक्षांतर्गत मतमतांतर पाहायला मिळताय. त्यामुळे यावर तोडगा कसा काढला जातो? हे मोठा आव्हान तीन पक्ष समोर असणार आहे.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकी संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षांतर्गत चर्चा काय आहे? (Mahavikas Aghadi Rajya Sabha Election 2026)

महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक संख्याबळ हे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर दावा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे, असं मत नेत्यांनी मांडलं. मात्र राज्यसभेसाठी शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती आहे.  तर विधान परिषदेसाठी ठाकरेंची सेना आपल्या पक्षाचा उमेदवार देईल. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी घ्यावी अशी पक्षातील इच्छा आहे.

राज्यसभा विधान परिषदेसाठी एक एक उमेदवार देण्यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि नेत्यांचे नेमकं म्हणणं काय आहे?

1. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली आधी भूमिका स्पष्ट करावी-

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना राज्यसभेची महाविकास आघाडीकडून उमेदवारी शरद पवार यांना देण्याऐवजी काँग्रेसने स्वतः घ्यावी. जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्यास त्याचा फटका ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपली भूमिका आधी स्पष्ट करावी असे मत काँग्रेसकडून मांडण्यात आलं आहे.

2. विधान परिषद किंवा राज्यसभा दोन्हीपैकी एका जागेवर काँग्रेसने दावा करावा-

ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणण्यानुसार राज्यसभा जागेसाठी शरद पवार यांना पाठिंबा द्यायचा आणि विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यायचा हे काँग्रेसला मान्य नाही कारण काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये 16 आमदारांचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक एक जागा घेत असतील तर मग काँग्रेसच्या हाताला काय येणार? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे…त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषद एका जागेवर काँग्रेस दावा करणार हे जवळपास काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत निश्चित झाला आहे.

3. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बाजूला ठेवून राज्यसभेसाठी काँग्रेसने उमेदवार द्यावा आणि विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार द्यावा-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका तळ्यात मळ्यात असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेस आणि ठाकरेंचे शिवसेनेने एकत्रित येऊन काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवार द्यावा आणि विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार द्यावा, कारण दोन्ही पक्षांचे संख्यावर बघता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बाजूला ठेवून सुद्धा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो असेही मत काँग्रेस नेत्यांकडून मांडण्यात येतंय.

10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर- (Rajya Sabha Election 2026)

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार- (Maharashtra Rajya Sabha Election 2026)

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. (Rajyasabha Election 2026)

संबंधित बातमी:

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.