तिसरा शनिवार मानहानीच्या प्रकरणांनी गाजला; राहुल गांधी नव्या जामीनदारासाठी भिवंडी कोर्टात, माले
मानहानीचा खटला: राजकीय वर्तुळात आजचा शनिवार मानहानीच्या खटल्यांमुळे विशेष चर्चेत राहिला. एका बाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भिवंडी न्यायालयात हजर झाले, तर दुसऱ्या बाजूला मालेगावात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यातील अब्रुनुकसानीचा वाद मिटला. त्याचवेळी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या वक्तव्यावरून शायना एन सी (Shaina NC) यांनी दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात या तिन्ही घडामोडींची जोरदार चर्चा रंगली.
Rahul Gandhi: भिवंडी कोर्टात राहुल गांधी
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनी सभेत “आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली” असे विधान केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांचे जामीनदार म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर होते. मात्र डिसेंबर 2025 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर न्यायालयाने नवीन जामीनदार सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी न्यायालयात राहुल गांधी यांचा जामीन स्वीकारला. न्यायालयाने जामीनपत्र मंजूर केल्याने पुढील सुनावणीचा मार्ग मोकळा झाला.
Sanja Raut and Dada Bhuse: मालेगावात राऊत-भूसेंची दिलजमाई
दरम्यान, मालेगाव न्यायालयात मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला मागे घेतला. दोन्ही नेते न्यायालयात एकत्र पोहोचल्याचे दृश्यही चर्चेचा विषय ठरले. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना गैरसमजामुळे हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले. “आमचे संबंध जुने आहेत. चुकीच्या माहितीवर हा वाद निर्माण झाला,” असे ते म्हणाले. दादा भुसे यांनी सांगितले की, गिरणा साखर कारखान्याबाबत 178 कोटींच्या कथित घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र राऊत यांनी माफी मागितल्याने हा खटला मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Arvind Sawant shaina nc: सावंत-शायना एन सी प्रकरणाची सुनावणी
मुंबईतील माझगाव न्यायालयात शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन.सी. हजर झाल्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान अरविंद सावंत यांनी त्यांच्याबाबत “इंपोर्टेड माल” असे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झाल्याचा दावा करत शायना एन.सी. यांनी सावंत यांच्याविरोधात मानहानी आणि विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची आज महत्त्वाची सुनावणी झाली असून आज शायना एनसी यांची साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणी पुढील सुनावणी 16 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, एकाच दिवशी राज्यातील तीन वेगवेगळ्या न्यायालयांत प्रमुख राजकीय नेत्यांची उपस्थिती आणि मानहानीच्या प्रकरणांवर झालेली घडामोड यामुळे हा शनिवार राजकीयदृष्ट्या गाजला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.