शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे एका तासात 4 लाख कोटी बुडाले
मुंबई: भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आण निफ्टी 50 मध्ये मोठी घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. सर्वच क्षेत्रात काही गुंतवणूकदारांना नफा वसुलीचं धोरण स्वीकारल्यानं शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळला तर निफ्टी 50 निर्देशांक 25500 च्या खाली आला होता. सेन्सेक्स 800 अंकांच्या घसरणीनंतर 82481 पर्यंत खाली आला होता. सर्वच क्षेत्रात विक्रीचं सत्र पाहायला मिळालं. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरले.
Share Market : चार लाख कोटी गमावले
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात झालेल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 469 लाख कोटींवरुन 465 लाख कोटींवर आलं आहे. म्हणजेच अवघ्या तासाभरात गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले.
शेअर बाजारातील घसरणीची कारणं
शेअर बाजारातील घसरणीच्या कारणांचा विचार केला असता अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय रद्द केल्यानंतर ट्रम्प प्रशासनानं आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा टॅरिफ लावले आहेत. व्यापार विस्तार कायदा 1962 च्या कलम 232 चा वापर करुन सुप्रीम कोर्टाच्या निर्णय बाजूला ठेवण्याच्या दिशेनं ट्रम्प प्रशासन पाऊल टाकणार आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टानं डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेताना अधिकाराचा मर्यादेबाहेर जाऊन वापर केल्याचं म्हटलं होतं. टॅरिफ लागू करण्याचे अधिकार अमेरिकन काँग्रेसचे असून ट्रम्प यांनी स्वत: त्याबाबत निर्णय घेतले, असं म्हणत अमेरिकन सुप्रीम कोर्टानं टॅरिफ बेकायदेशीर ठरवलं होतं. यानंतर संतापलेल्या ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टावर टीका केली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी 15 टक्के टॅरिफ लादलं आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. इराणमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात सर्वत्र आंदोलन पसरत असल्यानं गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्या आहेत.
आयटी स्टॉक्समधील घसरण हा देखील प्रमुख मुद्दा आहे. निफ्टी आयटी निर्देशांक 4 टक्क्यांनी घसरला. तर, फेब्रुवारी महिन्यात निफ्टी आयटी 20 ट्क्यांनी घसरला आहे.
ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 1 टक्क्यांनी वाढला आहे. एका बॅरलसाठी 72 अमेरिकन डॉलर मोजावे लागत आहेत.ब्रेंट क्रूड ऑईलनं सहा महिन्यांचा उच्चांक गाठल्यानं गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.