‘संजू सॅमसनमुळेच…’; झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर तिलक वर्मा काय म्हणाला? VIDEO व्हायरल

टिळक वर्मा भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 विश्वचषक 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मधील पहिल्या पाच डावांत एकूण 107 धावा… स्ट्राइक रेटवर प्रश्नचिन्ह… झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तिलक वर्मा प्रचंड दबावाखाली होता. त्याच्या बॅटमधून मोठी खेळी येत नव्हती आणि टीकेची झोड वेगळीच उठली होती. मात्र, चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर टीम मॅनेजमेंटने तिलकच्या फलंदाजी क्रमात बदल करण्याचा घेतलेला निर्णय अचूक ठरला. ऑर्डरमधील डिमोशन हेच तिलकसाठी परफॉर्मन्समधील प्रमोशन ठरले.

फॉर्ममध्ये पुनरागमन

झिम्बाब्वेविरुद्ध तिलकने तुफानी फलंदाजी करत केवळ 16 चेंडूत नाबाद 44 धावांची धमाकेदार खेळी केली. तब्बल 275 च्या स्ट्राइक रेटने खेळताना त्याने 3 चौकार आणि 4 षटकार ठोकले. याआधी स्पर्धेत तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. त्या स्थानावर त्याने 25, 25, 25, 31 आणि 1 अशा धावा केल्या होत्या. मात्र या सामन्यात त्याला सहाव्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि हा प्रयोग त्याच्यासाठी वरदान ठरला.

संजू सॅमसनचे कौतुक

सामन्यानंतर तिलकने पत्रकार परिषदेत सर्व मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केले आणि सलामीवीर संजू सॅमसनचे भरभरून कौतुक केले. त्याने विजयाचे श्रेय सलामीवीरांना देताना म्हटले, “ओपनर्स चांगली सुरुवात करून देतात, तेव्हा तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो. आज संजू सॅमसनने जे केले, ते अप्रतिम होते. त्यानंतर आम्ही सर्वांनी त्याच पद्धतीने खेळ पुढे नेला. पॉवरप्लेमध्ये 3-4 विकेट्स पडल्या तरी आपली आक्रमक शैली बदलायची नाही, अशी टीममध्ये चर्चा झाली होती. आम्ही प्रत्येक चेंडूवर फटके मारण्यास तयार आहोत, हे प्रतिस्पर्ध्यांना दाखवायचे होते.”

स्वतःच्या भूमिकेबाबत स्पष्ट मत

स्वतःच्या फलंदाजीबाबत तिलक म्हणाला, “संघाला ज्या गोष्टीची गरज असेल, ते करण्यासाठी मी कायम तयार असतो. गेली चार वर्षे मी मुंबई इंडियन्ससाठी हीच भूमिका पार पाडत आलो आहे. भारतीय संघासाठीही अशा परिस्थितीत मी काही सामने खेळलो आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी नवी नाही. मला फक्त एका चांगल्या डावाची प्रतीक्षा होती आणि देवाचे आभार की ती संधी आता मिळाली. योग्य वेळी ही खेळी आली असून पुढेही मी संघाला विजय मिळवून देऊ शकतो, असा मला विश्वास आहे.” (टिळक वर्मा भारत वि झिम्बाब्वे T20 विश्वचषक 2026)

हे ही वाचा –

India Semi-Final Scenario : खराब नेट रन रेटमुळे टीम इंडिया जाणार स्पर्धेतून बाहेर?, वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी धक्कादायक समीकरण, सगळेच चक्रावले

आणखी वाचा

Comments are closed.