शरद पवार मोठे नेते पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही; ठाकरेंच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते राज्यसभा (अध्यक्ष) आणि विधानपरिषदांच्या निवडणुकांकडे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कार्यकाळ संपत असल्याने शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे, प्रकृतीच्या कारणास्तव ते थांबणार की पुन्हा राज्यसभेवर जाणार याचं कोडं पुढील काही दिवसांतच उलगडेल. मात्र, राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena) आमदार आदित्य ठाकरेंनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे.

राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही, आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं मत मांडले आहे. सन 2020 साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. त्यानंतर संजय पवार आमचे उमेदवार दिलेले असताना आणि संख्याबळ असताना सुद्धा ते पराभूत झाले. आता संख्याबळानुसार आमचं संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले.

शरद पवार हे मोठे नेते आहेत, शरद पवार उमेदवार म्हणून इच्छुक असतील आणि त्यांच्या नेत्यांकडून तसेच महाविकास आघाडीकडून तसं बोललं गेलं तरीही आम्ही आमचा राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नाहीत, अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी राज्यसभेच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा केला आहे. विधान परिषद आणि राज्यसभा या दोन वेगवेगळ्या जागा आहेत. दोन वेगळे विषय आहेत, विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने ती जागा सुद्धा अर्थातच आमची असेल, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरेंची बैठकीला दांडी?

महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे यांना दोनवेळा राज्यसभेच्या बैठकीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, आदित्य ठाकरे बैठकीला गेले नाहीत. राज्यसभेची एक जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम आहेत. मविआ म्हणून विधानभवनात बैठक बोलावण्यात आली. मात्र या बैठकीला केवळ शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेत्यांनी बैठकीला दांडी मारली आहे.

महाराष्ट्रातून कोण निवृत्त होणार?

महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सर्वात मोठे नाव आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहन पाटील यांचाही समावेश आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी : रोहित पवारांचा FIR का घेत नाही, सरकार संशयाची भूतं नाचवतंय, सुनेत्रा वहिनींनी बोललं पाहिजे, राज ठाकरेंचं रोखठोक भाष्य

आणखी वाचा

Comments are closed.