अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर पार्थ पवार, सुनेत्रा पवार गप्प का? FIR साठी त्यांनी दबाव आणला पाहिजे – संजय राऊत
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीला निघाले होते. सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असून अजितदादांच्या संशयास्पद मृत्युवर पार्थ पवार, सुनेत्रा पवार गप्प का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच एफआयआर साठी त्यांनी दबाव आणला पाहिजे, असेही ते मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या अपघातावर सुनेत्रा पवार गप्प का आहेत हा प्रश्न उपस्थित केला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, हा प्रश्न मी सुद्धा विचारला होता. यावर पार्थ पवार यांनी बोलायला पाहिजे. ज्यांनी पती गमावला त्या सुनेत्रा पवार यांनी बोलायला पाहिजे. त्या स्वत: उपमुख्यमंत्री आहेत, तरी एफआयआर घेतला जात नाही म्हणजे काय?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा हा विषय आहे. एफआयआर घ्या म्हणून सुनेत्रा पवार यांनी 40 आमदारांसह गृहमंत्र्यांवर दबाव आणला पाहिजे. रोहित पवारांचे म्हणणे आहे की, माझ्या काकांच्या मृत्यूचा मला संशय येत आहे. व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असून हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे अशा प्रकारची एफआयआर रोहित पवार यांना हवी आहे. हीच मागणी ज्यांनी आपला पती गमावला, ज्यांनी पिता गमावला त्यांनी केली पाहिजे. ते का करत नाही हा प्रश्न आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, व्हीएसआर कंपनी ही यातील आरोपी क्रमांक एक असून डीजीसीए सहआरोपी आहे. या दोघांची गुन्हेगारी स्वरुपाच्या कृत्यांमध्ये जी हातमिळवणी आहे त्यातून अजित पवारांचा मृत्यू ओढावला. म्हणून त्याची चौकशी होत नाही. व्हीएसआर कंपनीतील अज्ञात भागीदार कोण आहेत? आंध्रचे राजकारणी, महाराष्ट्रातले काही राजकारणी, अत्यंत महत्त्वाचे उद्योगपती हे सगळे या कंपनीतील बेनामी भागीदार आहेत. चौकशी झाली तर यांचे मुखवटे खाली पडतील.
डीजीसीए ही या देशातील सगळ्यात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आहे. खरे म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. अहमदाबादमध्ये 300 पेक्षा जास्त लोकांचे बळी हे डीजीसीएच्या हलगर्जीपणामुळे गेले. अजित पवारांचा बळी त्यातूनच गेलेला आहे. काही दिवसांपूर्वी रांचीमध्ये एअर अॅम्ब्युलन्स कोसळली, हे डीजीसीएचे पाप आहे. ड़ीजीसीए फक्त भ्रष्टाचार करते, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
…म्हणून अजित पवार अस्वस्थ होते
शिखर घोटाळ्या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट आला असून अजित पवारांसह सर्वांना क्लीनचीट देण्यात आली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, भ्रष्टाचारासंदर्भातील क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले. पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही. अजित पवार असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही. रिपोर्ट क्लोज करण्यासाठी फाईल दिल्लीला गेली. अमित शहांनी त्याच्यावरती नव्याने चौकशी करा असा शेरा मारून परत पाठवला, त्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. ज्या कारणासाठी मी भाजप बरोबर आलो तर ती फाईलच बंद होत नसेल तर कशाकरता थांबायचे यामुळे ते अस्वस्त होते आणि त्यांना परत माघारी जायचे होते.
Comments are closed.