वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार, सॅम करनचा इशारा

T20 विश्वचषक 2026 मुंबई : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघ 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे मैदानावर आमने सामने येतील. भारत आणि इंग्लंड मॅचपूर्वी इंग्लंडचा खेळाडू सॅम करन यानं पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे. वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, वानखेडेचं मैदान शांत राहील यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं सॅम करन म्हणाला. सॅम करन म्हणाला की दोन्ही संघ एकमेकांविरोधात इतक्या वेळा खेळले आहेत, त्यांच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सराव करण्यापूर्वी सॅम करन यानं म्हटलं की आम्ही या मैदानावर खूप खेळलो आहे, त्यामुळं लपवण्यासारखं काही नाही. आमच्याकडे सरावासाठी दोन दिवस आहेत, ज्यामुळं परिस्थितीसोबत जुळवून घेण्यात मत होईल. आम्ही या मैदानांवर इतक्या वेळा खेळलो आहे ज्याची सवय झाली आहे. आम्ही भारतीय खेळाडूंसोबत खूप क्रिकेट खेळतो, हे लपून राहिलेलं नाही, असंही सॅम करन यानं म्हटलं.

वानखेडे स्टेडियम शांत ठेवणार

सॅम करन म्हणाला की मागील कामगिरी महत्त्वाची नसते, हा वर्ल्ड कप आहे, उपांत्य फेरीत आम्ही परीपूर्ण खेळ करु. वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांच्या जल्लोषाचा आवाज असेल मात्र आम्हाला त्यांना शांत कसं ठेवायचं हे माहिती आहे. वानखेडे स्टेडियम शानदार स्टेडियम आहे, मात्र गुरुवारी ते शांत राहील यासाठी प्रयत्न करु असं सॅम करन म्हणाला.

भारतीय टीम शानदार असून आमचे बहुतांश खेळाडू त्यांच्या विरोधात आणि आयपीएलमध्ये खेळले आहेत, असंही सॅम करन यानं म्हटलं.

भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. संजू सॅमसन याच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर भारतानं टी 20 वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली. वेस्ट इंडिजनं कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 196  धावा केल्या होत्या. संजू सॅमसनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं विजय मिळवला.

भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर यानं उपांत्य फेरीबद्दल बोलताना म्हटलं की इंग्लंड ही एक जागतिक टीम आहे. त्यांच्या खूप चांगले खेळाडू आहेत. आम्हाला सर्वांना माहिती आहे की वानखेडेवर खेळणं सोपं नसतं, आम्ही चांगली कामगिरी करु, अशी आशा असल्याचं गंभीर यानं म्हटलं होतं.

दरम्यान टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत दोन वेळा आमने सामने आले आहेत. दोन्ही संघांनी एक- एक वेळा विजय मिळवला आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.