भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड 5 मार्चला आमने सामने येणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.  मुंबई वाहतूक पोलिसांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याच्या निमित्तानं मरीन ड्राईव्ह परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन्ही संघातील विजेता संघ न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामना खेळेल.

मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबत एक्सवर एक पोस्ट केली आहे.  5 मार्च रोजी सायं 7 वाजता वानखेडे स्टेडियम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 उपांत्य सामना होणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी पूर्वनियोजन करावे व शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन केलं आहे.

प्रेक्षकांनी वानखेडे स्टेडियमपर्यंत कसं पोहोचावं?

मुंबई पोलिसांनी क्रिकेट चाहत्यांनी खासगी वाहनाऐवजी वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक  वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा असं आवाहन केलं आहे. प्रेक्षकांनी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मरीन लाईन्स स्थानकावर उतरावं. याशिवाय मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईनचा वापर करावा असं देखील सांगण्यात आलं आहे.

मुंबई पोलिसांनी आवाहन केल्यानुसार ज्या प्रेक्षकांना गेट क्रमांक 1, गेट क्रमांक 2 आणि गेट क्रमांक 7 मधून मैदानात तिकिटासह प्रवेश करायचा असेल त्यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन किंवा चर्चगेट मेट्रो स्टेशन येथून  ई मार्गावरुन यावं.

गेट क्रमांक 3 आणि 4 मधून ज्या प्रेक्षकांना मैदानात प्रवेश करायचा आहे, त्यांनी मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनच्या फुट ओवर ब्रीजवरुन रुपक कला शोरुम, महर्षि कर्वे रोडवरुन यावं.

ग्टे क्रमांक 5 आणि गेट क्रमांक 6 मधून जे प्रेक्षक तिकिटासह प्रवेश करणार असतील त्यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशन किंवा चर्चगेट मेट्रो स्टेशन फुट ओव्हर ब्रीज महर्षी कर्वे रोडवरुन आयकर कार्यालयाच्या विरुद्ध बाजूनं यावं, असं मुंबई वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई पोलिसांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांना सहकार्याचं आवाहन केलं आहे. तर, मैदानात प्रेक्षकांना प्रवेश सायंकाळी 4 वाजता दिला जाणार आहे.

न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील विजेता संघ न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामना खेळेल. अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.