अजितदादांचं विमान पडलं तिकडे एकही मोठं झाड नाही, केवळ लहान झुडपं आहेत; युगेंद्र पवारांकडून डीज
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती मृत्यूबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हा अपघात आहे की घात अशा चर्चा देखील सुरू आहेत, अशातच अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी देखील या संबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, अशातच आज बारामतीमध्ये बोलताना युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी म्हटलं की, सीआयडीच्या तपासाला एक महिना होऊन गेला खूप अगोदर चौकशीसाठी त्यांना बोलवायला पाहिजे होतं. जे पुरावे आमच्या समोर येत आहेत, आम्ही ते पुरावे तुमच्या सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला त्यात यश मिळेल असं वाटतं आहे. ही चौकशी खूप अगोदर व्हायला पाहिजे होती असं वाटतं आहे.फक्त लिएर जेट नको तर त्यांची सर्वच विमान ग्राउंड झाली पाहिजेत. त्या कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी लवकरात लवकर पार पाडली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
अगदी छोटीशी लहान झुडुप आहेत….
एएआयबीच्या अहवालाबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, मी घटनास्थळी सुरुवातीला पोहोचलो होतो. ज्या ठिकाणी विमानतळ आहे तो भाग दुष्काळी पडतो. तिथे पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही आज जरी त्या ठिकाणी गेला तरी त्या ठिकाणी तुम्हाला मोठी झाडी दिसणार नाही, जी आहे ती अगदी छोटीशी लहान झुडुप आहेत. सर्व प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लढत आहोत. प्राथमिक हा जो त्यांचा अहवाल होता, त्याचं स्वागत असेल पण खूप काही गोष्टी आहेत, खूप काही प्रश्न आमचे राहिले आहेत, ज्याला उत्तर मिळालं नाही. लवकरात लवकर या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी. लोकांच्या मनात संभ्रम आहे, संशय आहे, नक्की काय झालं, महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर मिळावं, असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार
शरद पवार आणि पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पार्थ पवार यांना संधी देण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांना पुन्हा संधी देण्यात येत आहे. याबाबत बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, सर्वात जास्त अनुभव शरद पवार याच्यांकडे आहे. साठ वर्ष आता त्यांची राजकारणात पूर्ण झाली आहेत. आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनाही त्यांची जाणीव झाली आहे. सर्वांनी पवार साहेबांना पाठिंबा दिला आहे. देश हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पवार साहेबांना राज्यसभेला पाठवलं आहे, असंही पुढे युगेंद्र पवारांनी म्हटलंय.
उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीप्रश्नाबाबत म्हणाले…
आता उन्हाळा सुरू झाला आहे. बारामती तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. 32 गावात जिथे व्यवस्थित पाणी मिळत नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच पाण्याचे नियोजन करायचा प्रयत्न करत आहोत. पूर्वी बारामतीच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळत होतं, दादा तिथे पालकमंत्री होते, त्यांना तालुक्याची माहिती होती. कुठून पाणी आणि कसं आणायचं होतं हे दादांना तिथे माहिती होतं.
आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. बारामती तालुक्याचा जो जिराईत भाग आहे, त्या भागाला या उन्हाळ्यात पाणी कमी पडू दिले नाही पाहिजे. चाऱ्याचा प्रश्न सोडवावा लागेल. शरद पवार यांनी आमदार असताना, मुख्यमंत्री असताना जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना या ठिकाणी आणली होती. शिरसाई भागाची पाहणी करून त्या योजनेची आज मी माहिती घेणार आहे, पाहणी करणार आहे. या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची किती आवश्यकता जाणवत आहे ते आपण समजून घेणार आहे, त्यांच्यासाठी पुन्हा काम करणार आहे असंही युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे.
पुढील आठवड्यात जनाईची पाहणी असेल किंवा पुरंदर उपसा योजनेची पाहणी असेल ती करेल. नाझरे धरणामधून देखील खूप पाणी बारामती तालुक्यात येत होतं हे सर्व पाणी आता येत राहिले पाहिजे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच आपण याचा आढावा घेणार आहोत. आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बारामतीच्या हक्कासाठी या जिल्ह्यासाठी लढत राहिलं पाहिजे. दादांसारखे दूरदृष्टीचे नेते आज आपल्यात राहिले नाहीत. आता आपली जबाबदारी आहे. बारामतीच्या हक्काचं सर्व पाणी आणण्याची जबाबदारी आता आपली सर्वसामान्य नागरिकांची आहे, असंही पुढे युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.