1 कोटी 25 लाखांची मागितली लाच, नाशिकमध्ये जीएसटीचे मोठे मासे ACB च्या गळाला; नेमकं प्रकरण काय?

नाशिक लाच बातम्या: जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी सव्वा कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राज्यकर विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. पाथर्डी फाटा येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जीएसटी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे (वय 47), सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे (वय 55) आणि खासगी व्यक्ती अमित हिरामण जाधव (वय 36) यांना अटक करण्यात आली आहे. पागे हे दिंडोरी रोड परिसरातील म्हसरूळ येथे तर दोंदे हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या मागील भागात राहतात. जाधव हा सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरातील रहिवासी आहे.

Nashik Bribe News: 1 कोटी 25 लाख रुपयांची मागितली लाच

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे शहरातील दामोदर चौक परिसरात कार्यालय आहे. या कार्यालयावर संशयित अधिकाऱ्यांनी जीएसटी संदर्भात कारवाई केली होती. या प्रकरणातील तपास लवकर पूर्ण करून देण्यासाठी राज्यकर उपायुक्त पागे आणि सहाय्यक आयुक्त दोंदे यांनी तक्रारदाराकडे 1 कोटी 25 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

Nashik Bribe News: तडजोडीअंती 1 कोटी देण्याचे ठरले

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने प्राथमिक पडताळणी केली असता, अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी तडजोड करत 1 कोटी रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे उघड झाले. त्यातील पहिला हप्ता म्हणून 20 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.

Nashik Bribe News: 20 लाखांची रक्कम स्वीकारताना पकडले रंगेहात

याच पार्श्वभूमीवर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने 20 लाख रुपयांची रक्कम दिल्यानंतर ती खासगी व्यक्ती अमित जाधव याने पागे आणि दोंदे यांच्या वतीने स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने जाधवला रंगेहात पकडले. त्यानंतर राज्यकर उपायुक्त पागे आणि सहाय्यक आयुक्त दोंदे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

Nashik Bribe News: कार्यालयात दोन लाख रुपयांची रोकड आढळली

या प्रकरणी तिन्ही संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने संशयितांची अंगझडती, वाहनांची झडती तसेच कार्यालयाची झडती घेतली. या वेळी सोमनाथ पागे यांच्या कार्यालयात दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही रक्कम पथकाने जप्त केली आहे. तसेच संशयितांचे मोबाईल फोनही तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या निवासस्थानी झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Nashik Bribe News: जीएसटी विभागात मोठी खळबळ

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांच्या पथकाने केली. या सापळा कारवाईत सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले, तर अपर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर आणि पोलीस निरीक्षक मोहन जगदाळे यांनी पर्यवेक्षण केले. या घटनेमुळे नाशिकमधील जीएसटी विभागात मोठी खळबळ उडाली असून सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

आणखी वाचा

Nashik Crime News: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरात नायलॉन दोरीने घेतला गळफास; नाशिकमध्ये खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.