मी सांगून सांगून थकलोय…; फायनलपूर्वी आर. अश्विन भारतीय गोलंदाजावर संतापला, दिला थेट अल्टिमेटम

आर अश्विन वरुण चक्रवर्ती आहे. भारताने टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. मात्र इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात महागडे ठरलेल्या वरुण चक्रवर्तीवर माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने जोरदार टीका करत इशाराही दिला आहे.

टी-20 वर्ल्ड कपमधील दुसरा सर्वात महागडा स्पेल

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्ती याने 4 षटकांत 64 धावा दिल्या आणि केवळ एक विकेट घेतली. हा टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील संयुक्तरीत्या दुसरा सर्वात महागडा बॉलिंग स्पेल ठरला. त्याने सनथ जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. जयसूर्याने 2007 मध्ये जोहान्सबर्ग येथे पाकिस्तानविरुद्ध 0/64 अशी कामगिरी केली होती. अश्विन याने सांगितले की, फलंदाज जर वरुणच्या स्पेलमध्ये सुरुवातीपासून आक्रमण करत असतील तर त्याचा त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो.

लाइन-लेंथ आणि स्पीडमध्ये बदल गरजेचा…

आर अश्विन म्हणाला की, फलंदाजांनी एखाद्या गोलंदाजाची धूलाई करणे ही सामान्य गोष्ट आहे. प्रत्येकाला माहीत आहे की आदिल रशीदकडे गुगली आहे. त्यामुळे फलंदाज आक्रमण करतीलच. पण अशा परिस्थितीत गोलंदाजाने अधिक टॅक्टिकल खेळणे गरजेचे असते.

त्याने पुढे सांगितले की, “फक्त स्पीडमध्ये बदल करून चालणार नाही, तर लाइन आणि लेंथमध्येही सातत्याने बदल करणे आवश्यक आहे. जर फलंदाज आक्रमण करत असतील तर त्याला योग्य रणनीतीने उत्तर द्यावे लागते.”

“मी हे सांगून सांगून थकलो….”

अश्विन म्हणाला की, “प्रत्येकवेळी फलंदाज त्याच्यावर आक्रमण करतात तेव्हा त्याचा आत्मविश्वास कमी होत जातो. मी हे वारंवार सांगत आहे आणि आता सांगून सांगून थकलो आहे. डावखुऱ्या फलंदाजांना राउंड द विकेट गोलंदाजी करू नका.”

भारतासाठी दुसरा सर्वात महागडा स्पेल

वरुण चक्रवर्ती आता सर्व टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर होता. त्याने 2023 मध्ये गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0/68 धावा दिल्या होत्या. तसेच युजवेंद्र चहलच्या नावावरही 2018 मध्ये डरबन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0/64 अशी नोंद आहे.

पुन्हा एकदा भारत-न्यूझीलंड अंतिम लढत

टीम इंडिया आता 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यातही भिडले होते.

हे ही वाचा –

Ind vs Nz Final : नरेंद्र मोदी स्टेडियम टीम इंडियासाठी लकी नाही..;  फायनलपूर्वी पाकिस्तानी दिग्गजाची भाकीत

आणखी वाचा

Comments are closed.