तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली

बुलढाणा हत्येची बातमी: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान रचत पतीनेच आपल्या शिक्षक असलेल्या पत्नीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. वृषाली प्रकाश गावंडे असे या मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा नवरा प्रकाश गावंडे यानेच सुपारी देऊन वृषाली यांची हत्या (Murder News) घडवून आणली. वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होत्या. 2 मार्च रोजी वृषाली गावंडे त्यांच्या स्कुटीवरुन शाळेत जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यामध्ये वृषाली गावंडे यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे पोलीस जेव्हा अपघातस्थळी पोहोचले तेव्हा प्रकाश गावंडे आपल्या पत्नीच्या मृतदेहाच्याशेजारी बसून रडत होते. त्यामुळे पोलिसांना सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे वाटले आणि त्यांनी फार तपास केला नाही. मात्र, वृषाली गावंडे यांच्या माहेरच्या मंडळींनी यामागे घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. (Maharashtra Crime news)

आरोपी प्रकाश गावंडे हा गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पत्नीचा छळ करत होता. याआधीही त्याच्यावर 498 कलमाअंतर्गतचा गुन्हा दाखल झाला होता. तडजोड होऊन वृषाली पुन्हा नांदायला आली होती. आरोपी प्रकाश गावडे याने पत्नी वृषालीला यापूर्वी तीनवेळा जेवणातून विषारी औषध देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल तक्रार मृतक पत्नी वृषालीच्या भावाने पोलिसांत दिली होती. मात्र, प्रकाश गावंडे याच्यावर ठोस कारवाई झाली नव्हती. यानंतर प्रकाश गावंडे याने आपल्या पत्नीला ठार मारण्यासाठी पुन्हा थंड डोक्याने एक योजना आखली. त्याने आपला मित्र मंगेश मंगेश चहुळकर याला पत्नीला मारण्यासाठी 1 लाखांची सुपारी दिली. त्यानुसार, 2 मार्चला वृषाली स्कुटीवरून जात असताना भरधाव वेगात पाठीमागून आलेल्या टेम्पोने धडक दिली. या अपघातात वृषाली यांचा मृत्यू झाला.

वृषाली गावंडे यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी अपघाताच्या दिवशीचे या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही फोन कॉलचे रेकॉर्ड तपासले. या तपासाच्याआधारे पोलिसांनी वृषाली गावंडे यांच्या स्कुटीला धडक देणारा वाहनचालक मंगेश सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. मंगेश सूर्यवंशी याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा पती असलेला प्रकाश गावंडे व मध्यस्थी मंगेश चहुळकर (रा.पातुर्डा, तालुका संग्रामपूर) या दोघांनी आपल्याला एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे कबूल केले. एखाद्या क्राईम सिनेमालाही लाजवेल असा हा भयानक कट होता. हा ठरवून केलेला ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ होता, ज्याला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आता या तिन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या असून हत्येसाठी वापरलेलं वाहन आणि सुपारीचे पैसेही जप्त केले आहेत.

आणखी वाचा

फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?

आणखी वाचा

Comments are closed.