राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा; राज्यमंत्री योगेश कदमांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, पुढील काही दिवसा

एलजीपी गॅस टंचाईवर योगेश कदम : इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर दिसू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पुरवठा लांबणीवर पडल्यास येत्या काही दिवसांत हा उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Yogesh Kadam on LPG Shortage: नेमकं काय म्हणाले योगेश कदम?

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, हॉटेल बंद झालीत, अशी उदाहरणं आमच्यासमोर आली नाहीत. कमर्शिअल वापरासंदर्भात केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरगुती वापरासंदर्भात काही अडचणी नाहीत.  स्टोअरेज असतं तर सुविधा असतात. तुटवडा पुढील काही दिवसात नसेल, कारण जो गल्फमधील गॅसचा साठा आहे, तो पुरवठा आपल्याला झालाय. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल. केंद्र सरकारनं जे आदेश दिलेत, त्याचे पालन आम्ही करत आहोत. युद्धजन्य परिस्थिती झाली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झालाय. मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेऊन आहेत. उपाययोजना आणि इतर गोष्टींबद्दल ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी

दरम्यान, देशभरात उद्भवलेल्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावरून ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे या प्रकरणात अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा आपल्या देशातील जनतेच्या दैनंदिन जीवनावर तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होणार आहे. या युद्धामुळे सामान्य जनतेला कोणत्या परिणामांना, त्रासाला सामोरे जावे लागणार आहे याची केंद्र सरकारने संपूर्ण देशाला अधिकृत माहिती द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

LPG Gas Shortage: कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सतेज पाटलांचा सरकारवर संताप

आणखी वाचा

Comments are closed.