पुण्यात भीषण अपघात, भरधाव डंपरची दुचाकीला जोरदार धडक; आजोबा अन् नऊ वर्षीय नातीचा दुर्दैवी अंत

पुणे अपघात बातम्या: पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हातवे–तांभाड रस्त्यावर देऊळवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नऊ वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला. पाठीमागून भरधाव येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात (Accident News) घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाजी नामदेव शिळीमकर (वय 69) आणि तन्वी नितीन शिळीमकर (वय 9, दोघे रा. आरोह गार्डनजवळ, आंबेगाव रोड, पुणेमूळ रा. तांभाड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिळीमकर हे आपल्या नात तन्वीसह दुचाकीवरून आंबेगावहून मूळ गाव तांभाडकडे निघाले होते. हातवे–तांभाड मार्गावरील देऊळवाडीजवळ ते पोहोचले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एमएच 14/ एचयू 3777) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले.

Pune Accident News: डंपर चालकाला अटक

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी आजोबा आणि नातीला नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी डंपर चालक आकाश शिवाजी भुसने (रा. उबाळेनगर, वाघोली, ता. हवेली) याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Pune Accident News: कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

दरम्यान, शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून एकाच वेळी आजोबा आणि नातीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर मोठे दुःख ओढावले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करीत आहेत.

Pune Accident News: वेल्हे–नसरापूर मार्गावर दुचाकी-रिक्षाचा अपघात

दरम्यान, पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे–नसरापूर मार्गावर करंजावणे गावाच्या हद्दीत दुचाकी आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात पिता–पुत्रासह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दत्तात्रेय नथू कडू, त्यांचा मुलगा पप्पू दत्तात्रेय कडू (दोघे रा. मांगदरी, ता. राजगड) तसेच सचिन सोपान पवार (रा. लाशिरगाव) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास दुचाकी (क्र. एमएच 12 झेडए 3483) आणि रिक्षा (क्र. एमएच 12 टियु 8657) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली आणि पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सचिन पवार यांच्यावर नसरापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून कडू पिता–पुत्रावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा

Solapur Crime News: बाप आहे की शैतान? जन्मदात्या बापाकडून मुलीसोबत नको ते कृत्य, मुलगी गरोदर राहिल्यानंतर संतापजनक प्रकार उघड

आणखी वाचा

Comments are closed.