खोटं लेटरपॅड, 2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार
मुंबई: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी विधानभवनात (Vidhansabha) प्रवेश देण्याच्या पासेसचे नियम अधिक कडक करण्यात आले. तसेच, आमदार सदस्य, मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांशिवाय नियमानुसारच पासचे वाटप करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. मात्र. एमआयडीसीच्या लेटरहेडची हुबेहूब रंगीत झेरॉक्स वापर करून बोगस प्रवेशपत्रे वापरुन काहींना प्रवेश देण्यात आल्याचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. विशेष म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच हा मुद्दा उपस्थित करत चक्क 2000 ते 5000 रुपयांपर्यंत पैसे घेऊन विधानसभेचे पासेस दिल्याची तक्रार त्यांनी सभापतींकडे केली. विशेष म्हणजे यापूर्वीही पैसे घेऊन विधानसभेचे पास दिले जात असल्याचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित झाला होता, तरीही पुन्हा तेच समोर आलं आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अधिपत्याखाली असलेल्या MIDC विभागाचं खोटं लेटरहेड वापरुन बोगसपणे पासवाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खोट्या लेटरहेडवर विभागातील अधिकाऱ्यांची नावे घालून खोट्या सह्या केल्याचा प्रकार घडला आहे. काही शिपायांनी 50 पास दिले असून त्यासाठी 2000 ते 5000 रूपये घेतले गेल्याची माहिती स्वत: उदय सामंत यांनीच दिली. यासंदर्भात त्यांनी सभापतीकडे तक्रारही केली आहे. सभापती राम शिंदे यांनी यावर चौकशी समिती नेमून त्यात दोषी असलेल्या लोकांवर अधिवेशन संपेपर्यंत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, याप्रकरणी एसआयडीसीच्या अहवालाअंती निर्णय घेऊ, असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) पंकज भोयर यांनी सांगितले.
अमोल मिटकरींचाही सवाल
विशेष म्हणजे आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन एंट्री पासेस संदर्भात प्रश्न उपस्थि केला होता. विधानभवन परिसर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या बातम्या आल्याने विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्यानंतर देखील काही संघटनेचे कार्यकर्ते आत दिसले, दुपारी सभागृहात एका दालनात यथेछ्य जेवले, अधिवेशन काळात पूर्णवेळ पासेसही मिळवल्या व विशिष्ट प्रकारची पुस्तके विधीमंडळ परिसरात वाटली. आता प्रश्न असा की कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पासेस पुर्णपणे बंद असताना देखील काही विशिष्ट प्रचारक आत आले कसे? हे कोण यांचा शोध घेण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला होता.
बॉम्बेची अफेवेनंतर कडक नियम
दरम्यान, मुंबई विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल पाठवल्याने तीन दिवसांपूर्वी विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली होती. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधानभवन परिसरात सर्च आपरेशन सुरू केले. मात्र, थोड्या वेळेनंतर सुरक्षा रक्षकांनी तपासणी केल्यानंतर ही अफवा आणि फेक मेल असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या घटनेनंतर विधानभवन परिसरात एंट्रीचे नियम कडक करण्यात आले होते. तरीही, खोट्या लेटरहेडचा वापर करुन चक्क 50 पास बोगसपणे दिल्याने पुन्हा एकदा विधानसभा एंट्री पास आणि सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.