‘लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या….’, नागरी उड्डाण मंत्र्यांवर रोहित पवारांच

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे ‘थातूरमातूर’ आणि वेळ मारून नेणारे आहे,” अशी टीका करत रोहित पवारांनी (Rohit Pawar) थेट मंत्र्यांच्या पारदर्शकतेवरच सवाल उपस्थित केले आहेत.

ब्लॅकबॉक्सवरून मंत्र्यांची कोंडी

रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक गंभीर विसंगती मांडली आहे. त्यांनी विचारले की, “जर बारामती विमान दुर्घटनेतील ‘ब्लॅकबॉक्स’ सुरक्षित आहे, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले?” ब्लॅकबॉक्स हा कोणत्याही विमान अपघातातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. तो सुरक्षित असतानाही जळाल्याची खोटी माहिती का दिली गेली, याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

VSR कंपनीशी संबंधांवरून हल्लाबोल

रोहित पवार यांनी मंत्र्यांवर व्यक्तिगत आणि आर्थिक संबंधांचेही आरोप केले आहेत. “ज्या VSR कंपनीचे विमान अपघातात सापडले, त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मंत्र्यांनी पाहुणचार घेतला होता. त्यामुळे मंत्री आता त्या ‘मिठाला’ जागून चौकशीत पारदर्शकता टाळत आहेत का?” असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे.

अहमदाबाद अपघाताचा संदर्भ

केवळ बारामतीच नव्हे, तर अहमदाबादमध्ये झालेल्या ‘एअर इंडिया’ विमान अपघाताच्या चौकशीतही अमेरिकन सुरक्षा एजन्सीने मागितलेली माहिती का दिली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास करत असल्याचा दावा करत असताना ही माहिती का लपवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

इंडिया आघाडी संसदेत आवाज उठवणार
या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी काँग्रेससह ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील सर्व मित्रपक्ष हा विषय संसदेत प्रभावीपणे मांडतील, असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न असल्याने यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

रोहित पवारांची सोशल मिडीया पोस्ट

‘अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदसनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरु असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत.

VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? मात्र काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास आहे!’.

आणखी वाचा

Comments are closed.