सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

अहिल्यानगर : साईबाबांचं जगप्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतील लोणी गावात संतापजनक घटना घडली असून शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड (Acid attack) हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं अहिल्यानगर जिल्हा हादरला असून थेट विधिमंडळात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. शिर्डीतील घटना अत्यंत निंदानजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तर, मंत्री आदिती तटकरे, आमदार मनिषा कायंदे यांनीही या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला सोडलं जाणार नाही, असे सांगितले. आता, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिलीय.

शिर्डीतील अॅसिड हल्ला प्ररकणाची मी माहिती घेतली आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, रस्त्यावर थांबून त्या मुलाने तिच्यावर अॅसिड फेकलं. खरंतर ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे तिथे जवळपास सीसीटीव्ही नाहीत. पण हा मुलगा गावातलाच असू शकतो, त्यामुळे पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू आहे. पोलीस कसून तपास करत आहेत, आजच आरोपी पकडला जाईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, अशा घटनांमध्ये जे आरोपी असतात त्यांना कठोरातील कठोर शिक्षा आणि कारवाई व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

घडला प्रकार निंदनीय आहे, स्थानिक प्रशासन देखील तिथे आहे, लोणीमध्ये तिच्यावर उपचार सुरू असून मुलगी घाबरलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ॲसिड फेकत हे कृत्य केलंय. सीसीटीव्हीची अद्याप माहिती आढळलेली नाही. मात्र, स्थानिक पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आहेत, अधिकाधिक माहिती घ्यावी, अशी प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरेंनी दिली. मुलीच्या कुटुंबीयांसोबत बोलून माहिती घेऊ, अद्याप माहिती घेतली नाही. आमची मनोधैर्य योजना आहे, त्यातून आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्तावाची मागणी केली आहे. या घटनेवर आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत, पीडीता असेल, आई, मावशी असेल त्या घाबरलेल्या आहेत. मुलीवर उपचार करत नंतर इन्ट्रॉगेशन केलं जाईल. आरोपीसंदर्भात तपास सुरु आहे, सीसीटीव्ही संदर्भात चौकशी सुरू आहे. आरोपीला सोडलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, असेही आदिती तटकरे यांनी सांगितलं.

आमदार मनीषा कायंदेंचाही संताप

खरंतर आधी जर तिथे सीसीटीव्ही असेल तर ते सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं पाहिजे आणि जो कोणी आरोपी असेल त्याला ताब्यात घेतलं पाहिजे. हे अॅसिड नेमकं मिळतं कुठून याचासुद्धा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे. अशाप्रकारे सर्रासपणे अॅसिड हल्ले होत असतील आणि सहावीच्या मुलीला जर विद्रूप करण्याचा प्रकार घडत असेल तर यावर कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी, असे शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं. पोलिसांवर विश्वास आहे, त्याच्यामुळे आरोपीला ते पकडतील. मात्र, यावर त्या आरोपीला शिक्षा व्हायला हवी, असे आमदार मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

संतापजनक! शाळेतून घरी निघालेल्या 6 वीतील चिमुकलीवर ॲसिड हल्ला; नराधम फरार, अहिल्यानगर हादरलं

आणखी वाचा

Comments are closed.