लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या; विखे पाटलांची बोचरी टीका, शरद पवारांनाही टोला
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) मोठं यश मिळालं असून काँग्रेसचं पाणीपत झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत विक्रमी विजय मिळवला.त्यामुळे, देशभरातून भाजप समर्थक आनंद व्यक्त करत आहेत, भाजप नेतेही या विजयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेतृत्वावर टीका करत आहेत. बिहार निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाचा पूर्ण सुपडा-साफ झाला आहे, काँग्रेसचं अस्तित्वच संपुष्टात आलं आहे. काँग्रेस महाराष्ट्रात “एकला चलो रे” म्हणत आहे, कारण त्यांच्यासोबत जायला कोणी तयार नाहीत. त्यामुळे “एकला चलो रे” पलीकडे त्यांना भूमिका नाही. त्यांचे नेतेच बिहारला नदीत पोहोत होते, लोकांनी त्यांना त्यातच गटांगळ्या खायला लावल्यात, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna vikhe) थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जबरी टीका केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बिहार निवडणूक निकालावरुन काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रावादीवर बोचरी टीका केली. विदेशात जाऊन भारताला तुम्ही लोकशाहीचे धडे देता. पण, आता काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची देखील वेळ राहिलेली नाही, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. राज्यातील ठाकरे बंधू,जाणते राजे, वोट चोरी म्हणत राज्यात मोर्चे काढले त्यांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिलंय, असेही विखेंनी म्हटले.
शरद पवारांना दुसरा पर्यायच नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची याबाबत स्थानिक पातळीच्या नेत्यांना मोकळीक दिल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी सांगितलं. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. शरद पवार यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही, त्यांच्या पक्षात माणसंच राहिलेली नाहीत. त्यामुळे त्यांना कुणाशी युती केल्याशिवाय पर्यायच उरला नाही, अशी बोचरी टीका कॅबिनेटमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसेच, शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात आलं आहे, त्यांनी इतकी वर्षे राजकारणात जे पेरलं त्याचच प्रायश्चित करण्याची वेळ आली आहे, असा टोलाही विखे पाटलांनी लगावला. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यात पुन्हा युती होण्याच्या चर्चा सुरू आहेत याबाबत बोलताना विखे पाटलांनी पवारांवर जबरी टीका केली. या प्रश्नाचे उत्तर शरद पवारच देऊ शकतात. मात्र, शरद पवारांनी यापूर्वी अनेक पक्षांशी युती आघाड्या केल्या आहेत. त्या वेळच्या युत्या या राष्ट्राच्या व्यापक हितासाठी होत्या, आता ही युती कशासाठी आहे हे मला माहित नाही, असा टोला विखेंनी लगावला.
मला त्यांच्या भेटीबद्दल कल्पना नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, ही भेट पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपाच्या अनुषंगाने महत्त्वाची मानले जात आहे. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं. त्यांच्या भेटीबाबत आपल्याला कल्पना नाही, शेवटी काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होत असतात, असे म्हणत विखे पाटील यांनी अधिक बोलणे टाळले.
हेही वाचा
…तर पिंपरी चिंचवडच्या 128 जागा स्वबळावर लढणार; श्रीरंग बारणेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा
आणखी वाचा
Comments are closed.