आधी म्हणाल्या ते माझे गुरु, मग अशोक खरातचा डायरेक्ट एकेरी उल्लेख, राजीनामा देताच रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर टीका करत त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. (Maharashtra Politics news)

Rupali Chakankar: रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?

शिवनिका संस्थानमध्ये मी प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासून सदस्य म्हणून ट्रस्टवर काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर या ट्रस्टवर होते. मी ट्रस्टची सदस्य होते, त्यानंतर मी महिला आयोगाची अध्यक्ष झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपुष्टात आला होता. समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला मी आणि माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. तिथे होणाऱ्या कार्यक्रमांना आम्ही उपस्थित राहायचो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानलं, त्यानिमित्ताने आम्ही कुटुंब उपस्थित राहत होतो. माध्यमांकडून दाखवले जाणारे व्हिडीओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमोच्यानिमित्ताने पाद्यपूजा अनेकांनी केली, तशी मी आणि माझ्या पतीनेही केली. पाच-सहा वर्षांपूर्वी आपण ज्या व्यक्तीच्या संपर्कात असतो, ते पाच-सहा वर्षांनी एखाद्याचे कृत्य, वैयक्तिक वागणूक, वैयक्तिक आयुष्य याबद्दल आपल्याला सुतराम कल्पना नसते. आज जे आपल्यासोबत आहेत, ते उद्या पुढे जाऊन कसं वागतील, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजल्यावर मला धक्का बसला. मी लगेच ट्विटही केलं. या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे. पण अशोक खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती असायचं कोणतंही कारण नव्हतं. या प्रकरणात पोलिसांनी खोलवर आणि निष्पक्ष तपास करावा, हे मी आधीच सांगितले आहे. मी पोलीस महासंचालकांना भेटून तपासाबाबत पत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी भेटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेता सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या घटनेचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे व्हावा, यासाठी मागणी केली.

आपण काही लोकांवर विश्वास ठेवता, अध्यात्मिक भावना असते. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी संप्रदायातील आहे. आमची खरातवर असणारी श्रद्धा अध्यात्मिक दृष्टीकोनातून होती. त्यामुळे खरातच्या ट्रस्टसोबत जोडले गेले. परंतु, खरातची दुसरी बाजू मला माहिती नव्हती. जे काही कृत्य घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे, घाणेरडं आहे, त्याचं आम्ही कुठेही समर्थन करणार नाही. पोलिसांनी त्याचा तपास करुन आरोपीवर कठोर कारवाई करावी.  माझ्यासारख्या अनेक लोकांचे फोटो खरातसोबत आहेत. परंतु एक महिला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आले याचं वाईट वाटतंय, अशी खंत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा

‘मोठेमोठे गार केले गंमतमधी…’ सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट अन् व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत; रुपाली चाकणकरांना डिवचलं, म्हणाल्या….

आणखी वाचा

Comments are closed.