भोंदू ‘कॅप्टन’ खरातचा ऑस्ट्रेलियात पळण्याचा डाव उधळला! पोलिसांनी रोखली परदेश वारी, पोलिसांनी कस
नाशिक: अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणाऱ्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ ‘कॅप्टन’ खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी खेळी केली होती. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच खरातने (Ashok Kharat) देशाबाहेर पळ काढण्याचा चंग बांधला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हालचाली करत त्याचे परदेशात पळण्याचे सर्व रस्ते बंद केले. (Ashok Kharat)
न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात आश्रय घेण्याचा होता प्लॅन
मिळालेल्या माहितीनुसार, खरातला पोलिसांच्या अटकेची दाट शक्यता वाटू लागली होती. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची जय्यत तयारी केली होती. खरातचे परदेशात अनेक संबंध असल्याने तिथे स्थायिक होऊन पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा प्रयत्न होता. (Ashok Kharat)
९ मार्चला जारी झाली होती ‘लूक आऊट’ नोटीस
नाशिक पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून खरातची ही हालचाल सुटली नाही. तो विमानतळावरून परदेशात झेपावण्याआधीच पोलिसांनी ९ मार्च रोजी त्याच्याविरोधात ‘लूक आऊट’ (Lookout Circular) नोटीस जारी केली. या नोटीसमुळे खरातचे ‘हवाई’ पलायनाचे सर्व मार्ग बंद झाले आणि त्याला देशांतर्गतच राहावे लागले, ज्यामुळे अखेर त्याच्या मुसक्या आवळणे पोलिसांना शक्य झाले.
पोलिसांची ‘ती’ खेळी ठरली निर्णायक
जर पोलिसांनी वेळीच लूक आऊट नोटीस काढली नसती, तर हा हाय-टेक भोंदू बाबा आज परदेशात असता आणि त्याला भारतात परत आणणे कायदेशीररीत्या कठीण झाले असते. मात्र, नाशिक पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी कसं राबवलं ऑपरेशन खरात?
नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला अटक करण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या ‘स्मार्ट’ प्लॅनची आता जोरदार चर्चा रंगली आहे. चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत त्याला घरातूनच बेड्या ठोकल्या, ही कारवाई अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे समोर येत आहे.
नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अशोक खरातला अटक करण्यासाठी वेगळाच डाव आखला होता. आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचे सांगत पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली. दरम्यान, घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या. या अनपेक्षित हालचालीमुळे आरोपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.
गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. 18) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता पोलिसांना एक पेन ड्राइव्ह मिळाला. त्यामध्ये तब्बल 58 व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे. या पुराव्यांमुळे तपास अधिक गंभीर व व्यापक होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Who Is Ashok Kharat : कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
आणखी वाचा
Comments are closed.