‘ऑपरेशन तुतारी’आधी अशोक खरातच्या ऑपरेशन मुतारीचं काय करणार ते सांगा; संजय राऊतांचा सवाल
नवी दिल्ली : राज्यात ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन तुतारी राबवून ठाकरेंच्या सेनेसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही खासदार भाजपकडून फोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ठाकरेंचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. ऑपरेशन तुतारी राबवण्याआधी अशोक खरातच्या (Ashok Kharat) ऑपरेशन मुतारीचं काय करणार हे आधी सांगा, असा प्रश्न संजय राऊत यांनी भाजपला विचारला. तसेच राज्यात सुरू असलेल्या एकमेकांविरोधातील जादूटोण्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार असंही राऊतांनी विचारलं.
संजय राऊत म्हणाले की, “ऑपरेशन मुतारीमुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री अडचणीत येणार आहेत. हे ऑपरेशन मुख्यमंत्र्यांनी काही उगाच सुरू केलं नाही, त्यांच्या हाती काही मजबूत गोष्टी लागल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये राजकीय गोष्टी अघोरी पद्धतीने केल्या जात आहेत, एकमेकांवरती जादूटोणे सुरू आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ही जादूटोण्याची राजधानी होईल की काय अशी भीती आहे.”
खरातला बळ देणारे मंत्रिमंडळात बसलेत
देवेंद्र फडणवीस म्हणतात, या प्रकरणामध्ये राजकारण करू नका. मात्र ते स्वतः राजकारण करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली. ते म्हणाले की, “या सगळ्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला, कारण त्या सॉफ्ट टार्गेट होत्या. पण त्या खरातला बळ देणारे हे त्यांच्या मंत्रिमंडळात बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सहआरोपी करावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अशा बुवाबाजींना राजकारणात आणण्याच्या गोष्टी केल्या.”
या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संवेदनशील असायला हवी. कुणाला तरी वाचवण्याची भूमिका त्यांची नसावी. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सातत्याने खरातकडे जात होते, त्याला बळ देण्याची भूमिका त्यांची होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील भक्तांबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं संजय राऊत म्हणाले.
वारकरी संप्रदायालाही राजकारणात ओढलं
अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचा वापर फक्त आदिवासी आणि इतर समाजाविरोधात करणार का? उलट मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रिमंडळात बसणाऱ्या भक्तगणांवर या कायद्याचा वापर करावा अशी मागणी राऊतांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संघटनांना या बुवावाजीचा नाद आहे. या आधी वारकरी संप्रदाय राजकारणापासून बाजूला होता. पण आता वारकरी संप्रदायालाही आता मतांच्या राजकारणासाठी संघाने राजकारणात ओढलं असा आरोप राऊतांनी केला.
ऑपरेशन टायगरवर काय म्हणाले?
राज्यात ऑपरेशन टायगर सुरू असून त्या माध्यमातून ठाकरेंच्या खासदारांना फोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर संजय राऊत म्हणाले की, “खासदार नाराज आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर. विरोधी पक्षांच्या खासदारांना एक रुपयाचाही निधी दिला जात नाही, त्यामुळे विरोधी पक्षांचे खासदार सत्ताधाऱ्यांवर नाराज आहेत.”
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.