मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरातला गुरू मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातवर कारवाई झाली. अशोक खरातसोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका होऊ लागली. चाकणकर या अशोक खरातला गुरू मानायच्या, त्यामुळे या आधीच्या काही प्रकरणामध्ये चाकणकरांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचं समोर आलं होतं.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांनी दबाव टाकला. तसेच राष्ट्रवादीतील एका गटानेही ही मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आधी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार

रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका या ट्रस्टच्या संचालिका होत्या. त्यावरुन त्यांच्यावर आरोप होऊ लागले. अशोक खरात प्रकरणी जे कुणी दोषी असतील, अशोक खरातशी ज्यांचे कुणाचे संबंध असतील त्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून त्यांची अडचण वाढणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.