दीपक केसरकर, चाकणकरांच्या शेजारचा तो व्यक्ती कोण? अशोक खरात प्रकरणी अंधारेंनी दाखवला नवा फोटो

मुंबई : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केलेल्या अशोक खरात प्रकरणी आता नवनवे आरोप होत असून अनेक नवीन नावंही समोर येत आहेत. दीपक केसरकरांचा (Deepak Kesarkar) अशोक खरातशी (Ashok Kharat) संबंध असल्याचा आरोप ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आता आणखी एक नाव घेत केसरकरांवर आरोप केले. नामकर्ण आवारे हा व्यक्ती दीपक केसरकरांसमोर सातत्याने का दिसायचा? अशोक खरातशी त्याचे आर्थिक संबंध काय? असे अनेक प्रश्न अंधारेंनी विचारले. नामकर्ण आवारे हा अशोक खरात आणि राजकारण्यांचे काळे पैसे पांढरे करतो असा आरोपही अंधारेंनी केला.

सुषमा अंधारे यांनी या आधी केलेले आरोप दीपक केसरकरांनी फेटाळल्यानंतर आता अंधारेंनी आणखी काही आरोप केले आहेत. दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांसोबत दिसणाऱ्या नामकर्ण आवारे या व्यक्तीचा फोटो दाखवत त्यांनी संशय व्यक्त केला.

अनेक बड्या नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा, लोकांचा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचं काम नामकर्ण आवारे हा जगदंब पतसंस्थेच्या माध्यमातून करतोय. दीपक केसरकर हे राज्याचे शिक्षणमंत्री होते, त्यांच्यासोबत हा माणूस सातत्याने का दिसतोय? या माणसासोबत तुम्ही कोणते आर्थिक व्यवहार करताय? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले.

त्या 39 नेत्यांची नावं सांगा, अंधारेंचे आव्हान

भोंदू अशोक खरात प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसतंय. अशोक खरातला भेटलेल्या नेत्यांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंचे नेते दीपक केसरकरांवर निशाणा साधला. अशोक खरातला जवळपास 39 राजकीय नेते भेटलेत, मग माझचं नाव का घेताय असा सवाल दीपक केसरकरांनी केला होता. त्यावर पलटवार करत सुषमा अंधारेंनी केसरकरांना त्या 39 राजकीय नेत्यांची नाव जाहीर करण्याचं थेट आव्हान दिलं. तर अशोक खरातसोबत संबंध असल्याचं केसरकरांनी मान्य केल्याचंही सुषमा अंधारेंनी म्हटलं.

केसरकरांशी कोणतीही आर्थिक चर्चा नाही, आवारेंचा दावा

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी आरोप केलेल्या सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे यांनी दीपक केसरकरांसोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं. 2023 मध्ये दीपक केसरकरांना आम्ही सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीला भेट देण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी रुपाली चाकणकरही केसरकरांसोबत होत्या. त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार केला. याशिवाय कोणतीही चर्चा झाली नाही, असं आवारे यांनी म्हटलं. सिन्नर-शिर्डी मार्गावरून जाणाऱ्या सर्वच मंत्र्यांना आम्ही निमंत्रित करतो, असंही आवारेंनी म्हटलं.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.