शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा
Satara ZP Election Rada Shivsena: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलिसी बळाचा वापर करुन सत्ता हस्तगत करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या घटनेविरोधात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सभागृहात 10 पोलिसांनी आपल्याला कशाप्रकारे हातापायाला आणि कमरेला पकडून खेचले, याचा वृत्तांत सभागृहात सांगितला होता. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी थेट तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून तुषारी दोशी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी एकनाथ शिंदे (मराठी) यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनीही खमकी भूमिका घेत जयकुमार गोरे आणि तुषार दोशी यांच्या कृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले होते. (Maharashtra Politics)
सातारा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दिवशी जे काही घडलं ते शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालत यावर तातडीने पक्ष म्हणून महायुतीत हे पुन्हा होऊ नये यासाठी कठोर भूमिका घेण्यात यावी, असे सांगितले होते. सभागृहात शिवसेनेने रणनीती ठरवत सातारा पोलीस अधीक्षकांना या सगळ्या गोंधळानंतर निलंबनाची निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिले. त्यावर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय गंभीर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सगळा प्रकार मांडला. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर चौकशी करूनच निर्णय घेतला जाईल असं सांगत निलंबनाची कुठलीही कारवाई होणार नाही हे एकप्रकारे स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्र्यांची ही भूमिका पाहून पुन्हा एकदा एकनाथ शिंदें सोबत शिंदेंच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. जर पोलिसांवर कारवाई होत नसेल आणि पोलिसांकडून मंत्र्यांना धक्काबुक्की केली जात असेल तर मंत्री म्हणून राहून काय फायदा? असा नाराजीचा सूर मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केला होता. या सगळ्यानंतर त्याच रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलून दाखवली. जर असंच होत राहिलं तर सत्ताधारी नेते आणि मंत्री यांच्यावर अशीच पोलिसांची दडपशाही राहील. त्यामुळे यावर निर्णय घ्यावा आणि कारवाई करावी, अशी बाजू एकनाथ शिंदेंकडून मांडण्यात आली. शेवटच्या दिवशी तरी हा निर्णय सभापती देतील, अशी अपेक्षा शिवसेनेला होती. मात्र, सभापतींनी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय दिला जाईल, असं म्हणत निर्णय राखून ठेवला होता.
Shivsena Shinde Camp: तुषार दोशींवर कारवाई कशी झाली, सक्तीच्या रजेवर कसे गेले?
अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदेशंभूराज देसाई, दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यावर नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी “लोकप्रतिनिधीचा मान सन्मान ठेवला जाईल”,असा निर्णय तीन-चार दिवसात घेतला जाईल, असं त्यांना सांगितले. शिंदे शिवसेनेची नाराजी मात्र अधिवेशनानंतर सुद्धा कायम राहिली आणि विरोधकांनी सुद्धा सत्ताधारी महायुतीतील नाराजी नाट्यावर बोलायला सुरुवात केली.
हा वाद पुन्हा वाढू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. मात्र, हा वाद शांत करण्यासाठी आणि आपल्या सत्ताधारी मित्र पक्षाची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खात आहे त्यांना यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक होते.
कारण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून शिंदे शिवसेनेची खदखद वारंवार बाहेर येत होती. शिवाय आपल्या सत्ताधारी मित्रपक्षाकडून जबरदस्तीने पोलीस दबावाचा वापर करून भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोप होत होता. फक्त शिवसेनाच नाही तर दुसरा सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून सुद्धा आरोप केला जात होता. या विरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले होते. त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमा मलिन झाली. या सगळ्याचा विचार करता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीनंतर सभापती व इतर निवडीमध्ये महायुती म्हणून दोन्ही पक्षांची साथ मिळावी आणि पुन्हा गोंधळ होऊ नये यासाठी सुद्धा भाजपकडून ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.