RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातील सर्व वित्तीय संस्था, बँकांचं नियंत्रक म्हणून काम करते. एखाद्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून नियमाचं उल्लंघन झाल्यास आरबीआयकडून कारवाई केली जाते. आरबीआयकडून बँका आणि वित्तीय संस्थांची वेळोवेळी तपासणी केली जाते. या वेळी काही त्रुटी आढळून आल्यास संबंधित संस्थेला  किंवा बँकेला उत्तर देण्यास सांगितलं जातं. बँकांच्या उत्तरानं समाधान न झाल्यास आरबीआयकडून त्या संस्थांवर किंवा बँकांवर त्रुटी किंवा समस्या ज्या स्वरुपात असेल त्यानुसार कारवाई केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 30 मार्चच्या प्रसिद्धीपत्रकानुसार एअरटेल पेमेंटस बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. एअरटेल पेमेंटस बँकेला आरबीआयनं तब्बल 31.80 लाख रुपयांचा दंड केला आहे.

एअरटेल पेमेंटस बँकेवर का कारवाई?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एअरटेल पेमेंटस बँकेला 31.80 लाख रुपयांचा दंड केला आहे. वित्तीय प्रपत्र जाहीर करण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता नक केल्यानं आरबीआयनं बँकिंग नियमन कायदा 1949 च्या  कलम  46(4)(i) नुसार कारवाई केली आहे. आरबीआयनं एअरटेल पेमेंटस बँकेला कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यानंतर आरबीआयला खुलासा मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इतर बँकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकमधील द दावनगिरी जिल्हा मध्यवर्ती को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कर्नाटक, नगर सहकारी बँक लिमिटेड एटवाह, उत्तर प्रदेश यांच्यावर देखील आरबीआयनं कारवाई केली आहे.

दावनगिरी जिल्हा बँकेवर कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं द दावनगिरी जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड कर्नाटकला दीड लाख रुपयांचा दंड केला आहे. या बँकेनं केवायसी रेकॉर्ड अपडेट करणे आणि बँकिंग नियमन कायद्याचं पालन करण्यात अयशस्वी ठरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं इतर सहकारी सोसायटीमध्ये शेअर खरेदी करत बँकिंग नियमन कायद्याचं उल्लंघन केलं आहे. याशिवाय ग्राहकांची केवायसी संदर्भातील माहिती केंद्रीय केवायसी रेकॉर्डमध्ये अपलोड करण्यात बँकेला अपयश आलं आहे. ग्राहकांना एक ग्राहक क्रमांक देण्याऐवजी विविध ग्राहक क्रमांक देण्यात आले आहेत, असं निर्दर्शनास आल्यानं आरबीआयनं दंडात्मक कारवाई केली आहे.

उत्तर प्रदेशातील सहकारी बँकेवर 3 लाखांचा दंड

नगर सहकारी बँक लिमिटेड, एटवाह या बँकेला आरबीआयनं  3 लाखांचा दंड केला आहे. संचालकांना कर्ज मंजूर करणे, एखाद्या कर्जदाराला कर्ज देताना नियामक मर्यादांचं उल्लंघन करणे. केंद्रीय केवायसी रेकॉर्डस रजिस्ट्रीमध्ये केवायसी रेकॉर्ड अपलोड न करणे या कारणामुळं दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.