भाजप नगरसेवकांनीच भाजपच्या महापौरांचा निषेध, भाजपमधील जोरगेवार गट आक्रमक, बहिष्काराचा इशारा
चंद्रपूर : भाजपनं (BJP) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेत चंद्रपूर महापालिकेत (Chandrapur Municipal Corporation) काँग्रेसला विरोधात बसवत सत्ता स्थापन केली. भाजपनं चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन केली खरी मात्र त्यानंतर भाजपमधील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या गटातील वाद काही केल्या थांबत नसल्याचं पाहायला मिळालं. या वादाचा नवा अंक चंद्रपूर महापालिकेत सभागृह नेता निवडीवरुन पाहायला मिळाला.
चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका (Chandrapur BJP Crisis)
चंद्रपूर महानगरपालिकेतील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांमध्ये असलेल्या संघर्षाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. जोरगेवार गटाच्या 17 नगरसेवकांनी आपल्याच पक्षाच्या महापौरांवर बेईमानीचा आरोप करत त्यांचा केला निषेध, सोबतच महापौरांच्या यापुढे होणाऱ्या सर्व बैठकींवर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सभागृह नेते पदावरून भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत महापौर संगीता खांडेकर यांनी नगरसेविका जयश्री जुमडे यांचे नाव सभागृह नेतेपदासाठी जाहीर केले होते. मात्र, जोरगेवार गटाचे 17 नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांचे समर्थक अशा दहा नगरसेवकांनी भाजप गटनेते शेखर शेट्टी यांनाच सभागृह नेता करण्याची केली होती मागणी, मात्र महापौरांनी नगरसेवकांच्या या मागणीला न जुमानता सुधीर मुनगंटीवार गटाच्या नगरसेविका जयश्री जुमडे यांचे नाव जाहीर केले.
महापौरी संगीता खांडेकर यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ जोरगेवार गटाच्या 17 नगरसेवकांनी आज महापौरांच्या कार्यालयात जाऊन तीव्र निषेध नोंदवला. महापौर संगीता खांडेकर या बेईमानीने काम करत असल्याची टीका करत पुढील काळात महापौरांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या घडामोडींमुळे स्वपक्षीय महापौरांविरोधातच भाजप नगरसेवक आक्रमक झाल्याने महानगरपालिकेतील भाजपचे अंतर्गत राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवत भाजपनं मोठी खेळी केली होती. चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपमधील किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार गटातील नगरसेवकांमधील वादाचे नवे अंक पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.