सुनेत्रा पवारांचा काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांना फोन, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार?
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडून आता एक नवीन चाल खेळण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार या बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर रिंगणात उतरल्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न सुरुवातीला महायुतीकडून झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवरील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, काँग्रेसने ही पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेस अजूनही या भूमिकेवर ठाम असून बारामती पोटनिवडणुकीसाठी (Baramati Bypoll 2026) काँग्रेसचा उमेदवारही निश्चित झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा करणे, महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे. (Maharashtra Politics News)
सुनेत्रा पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यात फोनवर नेमके काय बोलणे झाले, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उतरवू नये आणि आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी केली असू शकते. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. आज सकाळपर्यंत तरी काँग्रेस पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढण्यावर ठाम होता. मात्र, आता सुनेत्रा पवार यांनी स्वत: हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याने काँग्रेसच्या या भूमिकेत बदल होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कालच सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन पाठिंबा मागितला होता. उद्धव ठाकरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन करुन बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशीही फोनवरुन चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे आता काँग्रेसचे राज्यातील आणि केंद्रातील नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
काँग्रेस पक्षाने बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यास सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळू शकतो. याशिवाय, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. अशात काँग्रेस पक्षाकडून आकाश मोरे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. आकाश मोरे हे धनगर समाजाचे आहे. बारामतीमध्ये धनगर समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने धनगर समाजाचा उमेदवार दिल्यास सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेही मैदानात उतरले तर सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हान आणखी कठीण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि रासपच्या महादेव जानकर यांना फोन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.