सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार ठरला, बारामतीत काँग्रेसचे ‘धनगर कार्ड’, आकाश मोरेंची घोषणा

पुणे : बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला असून आकाश मोरे (Akash More) यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांच्या नावाची घोषणा केली असून ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यामध्ये यश आल्याचं दिसत नाही.

काँग्रेसने बारामतीमध्ये धनगर कार्ड खेळण्यात आलं असून आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्याविरोधात पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. काँग्रेसने ही घोषणा केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

… तर उमेदवारी मागे घेणार

लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असून आमचा मूळ शत्रू हा भाजप आहे अशी पहिली प्रतिक्रिया आकाश मोरे यांनी दिली. बारामतीमध्ये अनेक मुद्दे असून त्यामध्ये अजित पवारांच्या अपघाताच्या तपासाचा मुद्दाही आहे, या मुद्द्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत असंही आकाश मोरे यांनी म्हटलं. जर सरकारने अजित पवारांच्या अपघातावर गुन्हा दाखल केला तर उमेदवारी मागे घेऊ असंही ते म्हणाले.

Who Is Akash More Baramati : कोण आहेत आकाश मोरे?

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ज्या उमेदवाराची घोषणा केली आहे ते आकाश मोरे हे वकील आहेत. त्यांचे वडील विजय मोरे हे आमदार होते. आकाश मोरे यांनी 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. ते काँग्रेसच्या विचाराने प्रेरित आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केले केले. प्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची भेट घेऊ असं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संवादही साधला होता. मात्र काँग्रेसने या ठिकाणी उमेवदार दिला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.