एखाद्याचा CDR काढणे हा गुन्हाच, 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते; निवृत्त पोलीस अधिकारी काय म्हणाले?
छत्रपती संभाजीनगर : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अशोक खरातचा मोबाईल सीडीआर (Ashok Kharat Mobile CDR) बाहेर काढला आणि खरातशी कोण कोण संपर्कात होतं याची माहिती जगजाहीर केली. त्यानंतर त्यावरून मोठा गोंधळ सुरू झाला. अंजली दमानिया यांच्याकडे हा सीडीआर (Mobile CDR) कुठून आला, याचा तपास करण्याची मागणी केली गेली. परंतु अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचा अनधिकृतपणे सीडीआर काढणे हा गुन्हाच असल्याचं मत निवृत्त पोलीस अधिकारी खुशालचंद बाहेती यांनी स्पष्ट केलं.
एखाद्याच्या फोनचे सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवणं हा गुन्हा आहे, तो त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे असं स्पष्ट मत निवृत्त पोलीस अधिकारी खुशालचंद बाहेती यांनी मांडलं आहे. भारतीय तार कायदा कलम 25 नुसार तो गुन्हा असून त्याबद्दल संबंधिताला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर मोबाईल कंपनीसुद्धा अशा प्रकारामध्ये दोषी असते असं ते म्हणाले.
Mobile CDR Case : वैयक्तिक स्वातंत्र्याचं उल्लंघन
निवृत्त पोलीस अधिकारी खुशालचंद बाहेती म्हणाले की, एखाद्याचा सीडीआर मिळवणे, अशा प्रकारची वैयक्तिक माहिती मिळवणे हे घटनेतील अनुच्छेद 21 प्रमाणे स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन ठरते. त्यामुळे हे कुणालाही अनधिकृतपणे मिळवता येत नाही. एखाद्याचा अनधिकृतपणे सीडीआर मिळवणे म्हणजे भारतीय तार कायदा कलम 25 नुसार तो गुन्हा असून त्याबद्दल संबंधिताला 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
सीडीआर मिळाल्यानंतर त्याच्या गोपनियतेचा भंग करणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. सीडीआर काढणे हा एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे. त्यासाठी तक्रार करता येते आणि त्यावर नुकसान भरपाईचा दावाही करता येतो, असंही खुशालचंद बाहेती यांनी म्हटलं.
Ashok Kharat Mobile CDR : दमानिया यांच्याकडून सीडीआर जाहीर
अंजली दमानिया यांनी काही सीडीआर समोर आणले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरातसोबत झालेल्या संवादाचे डिटेल्स त्यांनी दिले. अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर त्यांच्याकडे नेमका सीडीआर आला तरी कुठून, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यानंतर यावरून होणारे सर्व आरोप अंजली दमानियांनी फेटाळले असून ‘नॉनसेन्स’ म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर टीका केली.
मी अनधिकृत गोष्टी मागत नाही, माझ्याकडे माहिती आली ती यंत्रणांना पाठवली. मला सीडीआर कसे मिळाले त्याची जरुर चौकशी करा, असं प्रतिआव्हानही अंजली दमानियांनी केलं. यावेळी अंजली दमानिया यांना अश्रूही अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.